बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आता हॉलिवूडही गाजवायला तयार झाला आहे. परंतू यंदा तो चित्रपटातून आपल्या समोर येणार नसून, अमेरिकेत आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या टी-२० स्पर्धेसाठी शाहरुखने लॉस एंजलिस संघाची मालकी स्विकारली आहे. शाहरुखने आपल्या संघाचं नाव LA Knight Riders असं ठेवलं आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत. मुंबई मिररने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

याआधी शाहरुख आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत त्रिंबागो नाईट रायडर्स संघाचा मालक आहे. अमेरिकेत येत्या काळात ही टी-२० स्पर्धा भरवली जाणार असून या स्पर्धेत न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को, वॉशिंग्टन डी.सी, शिकागो, डल्लास आणि लॉस एंजलिस असे सहा संघ सहभागी होणार आहेत. अमेरिकेत टी-२० क्रिकेटचं आयोजन करणाऱ्या American Cricket Enterprise या कंपनीमध्ये शाहरुख खानच्या फर्मची भागीदारी आहे. या संस्थेने अमेरिकन क्रिकेट बोर्डाकडून टी-२० स्पर्धेच्या आयोजनाची परवानगी घेतली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेसाठी शाहरुखने ‘Indian exclusivity’ या अंतर्गत लॉस एंजलिस संघाची मालकी घेतली आहे. ज्यामुळे इतर कोणाताही भारतीय संघ किमान ५ वर्ष या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

२०२२ साली आयपीएलचं आयोजन झाल्यानंतर लगेचच ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई मिरलला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही Knight Riders हा ब्रँड जगभरात प्रमोट करण्याचा प्रयत्न करत आहोत. याच प्रयत्नातून अमेरिकन टी-२० क्रिकेटमध्ये आपण संघ विकत घेतल्याचं शाहरुखने सांगितलं. याचसोबत शाहरुखची फर्म अमेरिकेत क्रिकेट स्टेडीयमच्या उभारणीसाठीही मदत करणार आहे.