पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि तडाखेबाज खेळाडू शाहिद आफ्रिदी याने ३७ चेंडूत लगावलेलं शतक क्रिकेटप्रेमींच्या अजूनही समरणात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या त्या शतकानेच आफ्रिदीला खरी ओळख मिळवून दिली. पण या शतकाशी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या बॅटचं एक खास कनेक्शन आहे. हेच कनेक्शन आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रातून सांगितले आहे.

१९९६ साली आफ्रिदीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुवून काढलं आणि विक्रमी ३७ चेंडूत शतक लगावलं. त्याने ४० चेंडूत १०२ धावांची तुफानी खेळी खेळली होती. त्यात त्याने ११ षटकार आणि ६ चौकार खेचले होते. हे त्या काळी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठरले होते. पण महत्वाचं म्हणजे हे शतक त्याने सचिनच्या बॅटने ठोकले होते. त्याने स्वतः याबाबत खुलासा केला आहे.

हे नक्की वाचा : ‘डोकं तपासून घे, डॉक्टरकडे मी घेऊन जातो’; गंभीरचा आफ्रिदीवर पलटवार

आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की सचिनने त्याची सर्वात लाडकी बॅट पाकिस्तनाचा खेळाडू वकार युनिस याच्याकडे दिली होती. सियालकोट येथे चांगल्या बॅट तयार करून मिळतात, त्यामुळे सचिनला त्याच्या ‘त्या’ बॅटसारखीच बॅट तयार करून हवी होती. त्यामुळे सचिनने ती बॅट वकारला दिली होती. पण ती बॅट सियालकोटला नेण्याआधी करणे ती बॅट मला दिली. आणि सुदैवाने त्या बॅटने मी तडाखेबाज खेळी करून ३७ चेंडूत शतक लगावले.

आफ्रिदीने या सामन्याबाबत आणखी एक किस्सा लिहिला आहे. ‘त्या सामन्याआधीच्या रात्री मला स्वप्न पडले की मी सामन्यात मुरलीधरन आणि जयसूर्या या दोघांच्या गोलंदाजीवर षटकार लगावत आहे. मी ही गोषग सामन्याआधी माझ्या रूममेटलादेखील सांगितली होती आणि ही स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रार्थना करण्यासही त्याला सांगितलं होते.’ असे आफ्रिदीने लिहिले आहे. त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले होते. कारण त्या सामन्यात संथ जयसूर्याने १० षटकात ९४ तर मुरलीधरनने १० षटकात ७३ धावा खर्च केल्या होत्या.