पालघरच्या शार्दुल ठाकूरनं २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरोधात कसोटी संघात पदार्पण केलं होतं. मात्र, १० चेंडू टाकल्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदान सोडवं लागलं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी शार्दुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी संघात स्थान मिळालं. आघाडीचे गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात शार्दुलला भारतीय संघात स्थान मिळालं. शार्दुलनं या संधीचं सोनं करत गोलंदाजी आणि फलंदाजीत आपली चमक दाखवली. गाबा येथील मैदानावर ऐतिहासिक विजायात शार्दुलनं मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावांत ६७ धावांची महत्वाची खेळी केली. तसेच पहिल्या डावांत ३ आणि दुसऱ्या डावांत ४ बळी मिळवले. शार्दुलच्या या अष्टपैलू खेळीनं सर्वांनाच प्रभावीत केलं. यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशी परतलेल्या शार्दुल ठाकूरची इंडियन एक्स्प्रेसनं मुलाखत घेतली. या मुलाखतीत शार्दुलनं दिलखुलास उत्तरं दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला, त्याबद्दल शार्दुलला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना शार्दुल म्हणाला की, २०१८ मध्ये सामन्यानंतर दुर्देवीरित्या दुखापतग्रस्त झाल्यामुळे मैदान सोडवं लागलं. यादरम्यान अनेकांनी संघातील आपलं स्थान निश्चित केलं होतं. गेल्या दोन वर्षांत माझ्यासमोर दोनच पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे, संधीची वाट पाहात बसणं आणि दुसरा म्हणजे, कठोर परिश्रम करुन संघात स्थान मिळवणं. मी दुसरा पर्याय निवडला. माझे वडील शेतकरी आहेत. वडिलांनी मला मेहनत करायला शिकवलं आहे. पीक वाया गेलं म्हणजे दुसऱ्यांदा शेती करायची नाही असं नसतं. हेच सूत्र क्रिकेटबाबतीतही लागू होतं, असं शार्दुल म्हणाला.

कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करण्यापेक्षा लोकलमध्ये सीट मिळवणं अवघड –

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीचा सामना कसा केला, याबाबत विचारलं असता शार्दुल ठाकूरनं मिश्कील प्रतिक्रिया दिली. दो म्हणाला की, एकवेळ कांगारुंच्या गोलंदाजाचा सामना करणं सोपं आहे. मात्र, लोकलमध्ये सीट मिळणं अवघड आहे. कारण तिथं चांगल्या टियमिंगची गरज असते. शार्दुल ठाकूरनं हे मस्कीरीत उत्तर दिलं आहे. पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर पॅट कमिन्स, मिचेल स्टार आणि जोश हेलवडू या तिकडीसमोर जगातील आघाची फलंदाजही नांगी टाकतात. अशा वेगवान माऱ्यासमोर शार्दुलनं षटकार लगावत धावांची सुरुवात केली होती. शार्दुल ठाकूर मुळचा पालघरमधील माहिम गावाचा रहिवाशी आहे. तो अनेकदा अवजड क्रिकेट कीटसह लोकलनं प्रवास करत सरावासाठी मुंबईत यायचा. शार्दुलच्या यशस्वी क्रिकेटपटू होण्यात मुंबई लोकलचं महत्वाचं योगदान राहिलं आहे. शार्दुलसाठी लोकल हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shardul thakur says getting a seat in local train harder than facing fast bowling nck
First published on: 23-01-2021 at 10:03 IST