ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन आयसीसीने पुढे ढकललं आणि आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआयचा रस्ता मोकळा झाला. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटक क्रीडा विश्वालाही बसला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी असमर्थता दर्शवल्यानंतरही आयसीसी आयोजनाबद्दल अधिकृत घोषणा करण्यासाठी वेळ घेत होतं. यावरुन बीसीसीआय अधिकाऱ्यांनी उघड नाराजी बोलून दाखवली होती. परंतू आयसीसीचे माजी अध्यक्ष शशांक मनोहरच यंदाची आयपीएल स्पर्धा होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते असा दावा माजी पाक खेळाडू बसित अलीने केला आहे.

“गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. आयपीएलसाठी बीसीसीआयने आशिया चषक आणि विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यास भाग पाडलं. मात्र आयसीसीच्या बैठकीत काय घडलं हे लोकांना माहिती नाहीये. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर ही स्पर्धा यंदा होणार नाही हे आयसीसीला माहिती होतं. खरं पहायला गेलं तर टी-२० विश्वचषक रद्द झाल्याची घोषणा ही गेल्या महिन्यातच व्हायला हवी होती. पण माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी जाणुनबुजून हा निर्णय उशीरा घ्यायला भाग पाडलं. आयपीएलचं आयोजन होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील होते. हे माझं मत आहे, याआधीही मी हे बोलून दाखवलंय.” बसित अली यांनी एका यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयने आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक रद्द करायला लावला या आरोपात फारसं तथ्य नसल्याचंही अली म्हणाला. आयसीसीच्या बैठकीत २०२० सालचा टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलून २०२१ मध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजन व्हावं असा सूर तयार झाला होता. मात्र या काळात PSL स्पर्धांचं आयोजन होत असल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाने याला नकार दिला. तसेच बीसीसीआयनेही याबाबतीत पाक क्रिकेट बोर्डाला पाठींबा दिला होता. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही याविरोधात आपलं मत दिल्याने आयसीसीने हा पर्याय रद्द केल्याचं अली याने म्हटलं आहे.