२०२० चा आघाडीचा विस्डन क्रिकेटपटू पुरस्कार (Wisden’s leading cricketer in the world) बेन स्टोक्सला जाहीर करण्यात आला. विश्वचषक आणि अ‍ॅशेस मालिकेतील त्याच्या कामगिरीच्या आधारावर स्टोक्सची या पुरस्कारासाठी निवड झाली. महिला क्रिकेटपटूंमध्ये विस्डन सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार एलिस पेरी हिला जाहीर करण्यात आला. एलिस पेरीला वर्षातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंच्या यादीतही स्थान मिळाले आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीला गेले ३ वर्षे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, मात्र यंदाच्या यादीत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माचा या यादीत समावेश नसल्यामुळे व्ही.व्ही.एस.लक्ष्मणने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

“माझ्या मते कोणीही क्रिकेट फॉलो करत असेल त्याला या यादीत रोहितचं नाव नसल्यामुळे आश्चर्यच वाटेल. अ‍ॅशेस ही नक्कीच महत्वाची मालिका आहे, पण विश्वचषक स्पर्धा ही अ‍ॅशेसपेक्षा मोठी आहे. याच स्पर्धेत रोहितने ५ शतकं झळाकवली आहेत, त्याचं पहिलं शतक हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साऊदम्पटनच्या कठीण खेळपट्टीवर होतं. विशेष म्हणजे या सामन्यात इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नव्हते. याव्यतिरीक्तही पाकिस्तान आणि इतर सामन्यांत रोहितने चांगली कामगिरी केली होती. त्याचं नाव या यादीत नसल्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला.” लक्ष्मण Cricket Connected या कार्यक्रमात बोलत होता.

विश्वचषकातील ९ सामन्यांत रोहितने ८१ च्या सरासरीने ६४८ धावा काढल्या होत्या, ज्यात ५ शतकांचा समावेश होता. मात्र न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली आणि उपांत्य फेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं. अंतिम फेरीत यजमान इंग्लंडने सर्वाधिक चौकारांच्या निकषावर न्यूझीलंडला हरवत विजेतेपद पटकावलं.