भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ८ एप्रिलला शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे श्रेयसला इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांना आणि संपूर्ण इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मुकावे लागणार आहे.

पुणे येथे २३ मार्चला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयसला दुखापत झाली. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोने फटकावलेला चेंडू झेप घेऊन अडवण्याच्या प्रयत्नात श्रेयसचा खांदा दुखावला. आता ८ एप्रिलला श्रेयसची शस्त्रक्रिया होणार असून, त्यानंतर किमान चार महिने त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे.