शेतकरी कुटुंबातील श्रीकांतची संघर्ष कहाणी
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था न सांगणेच बरे. जो लोकांसाठी अन्नधान्य पिकवतो, त्यालाच दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. अशाच एका कुटुंबातला त्याचा जन्म. घरच्यांची अवस्था त्याला पाहावेना. अहमदनगरमधल्या दहिगावासारख्या खेडय़ात तो कबड्डी खेळायचा. त्यानंतर तो भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये सरावाला गेला. भारताच्या संभाव्य संघातही त्याची वर्णी लागली. पण घरची दयनीय अवस्था त्याचे मन अस्थिर करत होती, त्याने दोनदा कबड्डीचा नाद सोडलाही. पण श्वास आणि ध्यास असलेल्या कबड्डीने त्याची साथ सोडली नाही. आता प्रो-कबड्डी लीगमध्ये तो बंगाल वॉरियर्सकडून खेळत आहे. या लीगने त्याला आर्थिक पाठबळ आणि प्रसिद्धी दिली, पण भारतीय संघातून चढाई करण्याच्या स्वप्नाचा पाठलाग मात्र अजूनही सुरू आहे.
‘‘दहिगावसारख्या लहान गावामध्ये कबड्डी खेळून मी मोठा झालो. त्यानंतर क्रीडा प्राधिकरणामध्ये सराव केला. पण वय वर्षे अठरानंतर आम्हाला बाहेर पडायला लागले. त्यानंतर घरची भीषण परिस्थिती पाहून मी कबड्डीचा विषय मनातून काढून टाकला. पण काही केल्या कबड्डी सोडवत नव्हती. त्यानंतर मी अमरावतीला आझाद मंडळाकडून खेळायला गेलो. तिथून मी राष्ट्रीय स्पर्धेत खेळलो, त्याचबरोबर भारताच्या शिबिरामध्येही माझी निवड झाली होती. त्या वेळी शिबिरामध्ये मी सर्वात लहान वयाचा खेळाडू होतो,’’ असे श्रीकांत सांगत होता.
प्रो कबड्डी स्पर्धेचा आता तिसरा मोसम सुरू असला तरी आतापर्यंत श्रीकांत प्रकाशझोतात आला नाही. पण यजमान पाटणा पायरेट्सविरुद्धच्या सामन्यात श्रीकांतने सात गुण मिळवले आणि त्याच्याकडे काही जणांच्या नजरा वळल्या. ‘‘पहिल्या दोन्ही हंगामात मी जयपूर पिंक पँथर्स संघाकडे होतो. पण दोन्ही मोसमांमध्ये मला दुखापतींनी ग्रासले, त्यामुळे लोकांसमोर माझे नाव येऊ शकले नाही. त्या वेळीही माझ्या मनात कबड्डी सोडायचा विचार आला होता. पण कबड्डी सोडून मी काय करणार, हा प्रश्न सारखा सतावत होता. त्या वेळीच यापुढे कोणतेही संकट आले तरी कबड्डी सोडायची नाही, असा निश्चय केला. त्यानंतर या मोसमात मी बंगालकडून खेळत असून चांगली कामगिरी होत आहे,’’ असे श्रीकांत म्हणाला.
भविष्याबाबत विचारल्यावर श्रीकांत म्हणाला की, ‘‘माझ्या गावात बरेच कबड्डीपटू झाले, पण त्यांना मोठय़ा स्तरावर खेळता आले नाही. आता मी २१ वर्षांचा आहे, त्याचबरोबर अथक मेहनत करायची तयारीही आहे. यापूर्वी मी बऱ्याच वाईट गोष्टी पाहिल्या आहेत, दुखापतींनीही मला ग्रासले होते.
त्यामुळे यापुढे माझ्या बाबतीत अजून काही वाईट होऊ नये, अशीच अपेक्षा आहे. प्रो कबड्डीमध्ये मी आता खेळत असलो तरी भारतीय संघातून खेळण्याचे माझे स्वप्न आहे. देशासाठी खेळण्याचा आनंद काही औरच असतो, मला त्याचीच अनुभूती घ्यायची आहे.’’