विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी बुमरा, कुलदीप, उमेश यांना विश्रांती

भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका

चेन्नई : चेन्नई येथे रविवार, ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या क्रिकेट ट्वेन्टी-२० सामन्यासाठी पंजाबचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमरा, उमेश यादव आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून या सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले आहे.

कोलकाता, लखनौ येथे झालेले पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने या ट्वेन्टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात अनेक बदल पाहण्यास मिळू शकतात. ‘‘भारतीय संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमरा, उमेश यादव आणि कुलदीप यादव यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीसाठी आराम देण्याचे ठरवले आहे,’’

असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड झालेल्या बुमरा, कुलदीप व उमेश यांना सर्वोत्तम शारीरिक स्थिती राखता यावी, याकरिता हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

विंडीजविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत कुलदीपने सर्वाधिक पाच, तर बुमराने तीन बळी मिळवले आहेत. उमेशला मात्र दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर संघात संधीच मिळालेली नाही. बुमरा आणि कुलदीपच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारवरील जबाबदारी वाढली असून खलिल अहमद त्याच्या साथीला असेल. मात्र कुलदीपला विश्रांती देण्यात आली असल्याने युजवेंद्र चहलचे तिसऱ्या सामन्यासाठी संघातील स्थान निश्चित मानले जात आहे.

२८ वर्षीय कौलने दोन सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले असून जून महिन्यात आर्यलड-विरुद्ध त्याने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या लढतीत त्याला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळू शकते.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून ब्रिस्बेन येथे पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळला जाणार आहे.

तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल.