भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व कमी करण्यासाठी आता उर्वरित दोन्ही कसोटींमध्ये आम्हास आक्रमक फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे असे ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक मॅथ्यु वेड याने सांगितले.
पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये कर्णधार मायकेल क्लार्क याने एकटय़ाने भारतीय गोलंदाजांचे आक्रमण रोखून धरण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यावरील ताण कमी करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारणे अनिवार्य आहे अन्यथा पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच आमची गत होईल असे सांगून वेड म्हणाला, जर आम्ही सावध पवित्रा घेत खेळलो, तर पुन्हा भारतीय गोलंदाज डोईजड होण्याची शक्यता आहे. आता हा सावध पवित्रा आमच्या अंगाशी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसऱ्या कसोटीत क्लार्कच्या साथीत आमची भागीदारी स्थिरावत असतानाच मी बाद झालो. त्यामुळे मी अतिशय निराश झालो. मी टिकलो असता तर हा सामना आम्ही वाचवू शकलो असतो. दुर्दैवाने क्लार्कला अन्य सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही. क्लार्कने किती सहन करावयाचे यालाही काही मर्यादा आहेत, असेही वेड याने सांगितले.