News Flash

अभिमानास्पद! क्रिकेटपटू मिताली राज ठरली १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू!

भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं नवा विक्रम आपल्या नावे केला आहे!

भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज

भारतीय पुरुष क्रिकेटपटूंनी नुकतीच इंग्लंडला कसोटी मालिकेमध्ये ३-१ अशी धूळ चारत भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंदित केलेलं असताना भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं भारतीयांचा हा आनंद द्विगुणित केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. एवढंच नाही, तर हा टप्पा पार करणारी मिताली ही जगभरात केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे! याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र, १० हजार २७३ धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. पण मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान देखील मिताली लवकरच मिळवेल, अशी प्रार्थना तिचे चाहते आता करत आहेत!

 

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीनं हा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिनं हा मैलाचा दगड पार करताच BCCI नं ट्वीट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

१० हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीनं आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत ३१० सामने खेळले आहेत. त्यापैकी १० कसोटी सामने, २११ एकदिवसीय सामने तर तब्बल ८२ टी २० सामन्यांचा समावेश आहे. १९९९मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जवळपास २२ वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

‘रेकॉर्ड क्वीन’ मिताली!

यासोबतच मितालीच्या नावे अजून एक विक्रम प्रस्थापित आहे. क्रिकेटच्या इतिहासात मिताली सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. तसेच २००हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे. त्याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ हजार ९३८ धावांचा विक्रम तिच्या नावावर आहे. तसेच, सर्वाधिक सलग १११ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याचा देखील विक्रम तिच्याच नावावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 12:30 pm

Web Title: skipper mitali raj becomes first indian women cricketer to complete 10000 runs in international cricket pmw 88
Next Stories
1 पृथ्वीचा पुन्हा तडाखा!
2 विश्वचषकासाठी संघरचनेचे प्रयोग!
3 “त्याला एकटं सोडा,” ऋषभ पंतसाठी रोहित शर्माने केली विनंती; जाणून घ्या नेमकं काय झालं?
Just Now!
X