अव्वल मानांकित सोमदेव देववर्मनला चेन्नईत सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत रामकुमार रामनाथनविरुद्ध विजय मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. युकी भांबरीने मात्र शानदार सुरुवात करत सहज विजयाची नोंद केली.
सोमदेवने आक्रमक खेळासह फोरहँडचे ताकदवान फटके लगावत रामकुमारवर वर्चस्व गाजवले. अखेर ७-५, ५-४ अशा स्थितीतून मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रामकुमारने माघार घेतली. सोमदेवला आता दुसऱ्या फेरीत मिकेल व्हीनस याच्याशी लढत द्यावी लागेल. युकी भांबरीने तैपेईच्या लिआंग-चि हुआंग याचे आव्हान एक तास १३ मिनिटांच्या लढतीनंतर ६-२, ६-४ असे सहज परतवून लावले. त्याला स्पेनच्या गेरार्ड ग्रॅनोलर्स याच्याशी झुंजावे लागेल. भारताच्या सनम सिंगने फ्रान्सच्या सहाव्या मानांकित डेव्हिड गुएझ याला ६-४, ७-५ असा पराभवाचा धक्का दिला. श्रीराम बालाजीने प्रज्ञेश गुनेनस्वरन याचा ६-३, ६-३ असा पराभव केला. आता सनम सिंग आणि बालाजी यांच्यात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.