भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर दिनेश कार्तिक गेल्या काही काळापासून चांगलाच फॉर्ममध्ये आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचं नेतृत्व करणाऱ्या दिनेश कार्तिकची इंग्लंडविरोधातील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे. पहिल्या सामन्यात मात्र दिनेश कार्तिकला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. नुकतंच दिनेश कार्तिकने गौरव कपूरचा शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन’मध्ये आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यासंबंधी काही खुलासे केले. कार्यक्रमात जुन्या आठवणींनाही दिनेश कार्तिकने उजाळा दिला.

कार्यक्रमात जुन्या आठवणींसंबंधी सांगताना कार्तिकने आपल्या एका चुकीमुळे सौरव गांगुली कशाप्रकारे भडकला होता यासंबंधी सांगितलं. २००४ मध्ये चॅम्पिअन ट्रॉफीदरम्यान भारत आणि पाकिस्तानदरम्यान अत्यंत महत्वाचा सामना खेळला जात होता. दोन्ही संघासाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २०० धावांचं आव्हान दिलं होतं. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात मात्र खराब झाली. पाकिस्तानने फक्त २७ धावांत तीन विकेट्स गमावले होते. यानंतर मोहम्मद युसूफ आणि कर्णधार इंजमाम उल हक यांनी संघाला सावरलं.

इंजमाम उल हकला अजीत आगरकरने ४१ धावांवर आऊट केल्यानंतर दिनेश कार्तिक मैदानात ड्रिंक्स घेऊन आला होता. सामना पाकिस्तानच्या हातात असल्याने भारतीय संघ थोडा दबावात होता. यावेळी कार्तिक मैदानात पळत येताच सौरव गांगुलीला जाऊन धडकला. यावेळी कार्तिककडे पाहून गांगुली संघाच्या खेळाडूंना म्हणाला ‘अशा लोकांना कुठून आणतात रे…कोण आहे हा’. कार्तिकने सांगितलं की, तेव्हा त्याचं वय १८-१० वर्ष होतं आणि सामना किती महत्वाचा आहे हे समजण्यापलीकडे होतं.

हा सामना पाकिस्तानने तीन गडी राखून जिंकला होता. पाकिस्तानकडून मोहम्मद युसूफने नाबाद ८१ धावा केल्या.