माजी क्रिकेटपटूंनी आपल्या आवडीच्या ११ खेळाडूंची निवड करून सर्वोत्तम क्रिकेट संघ जाहीर करण्याच्या ट्रेंडला फॉलो करीत आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने देखील आपल्या ‘ऑल टाईम बेस्ट-XI’ म्हणजेच सर्वोत्तम संघाची निवड केली आहे. गांगुलीने आपल्या ११ जणांच्या संघात भारताच्या दोन माजी फलंदाजांना स्थान दिले आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग याची गांगुलीने आपल्या संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे.

भारतीय क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या आपल्या माजी सहकाऱयांना गांगुलीने आपल्या सर्वोत्तम संघात समाविष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन आणि इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक याची निवड गांगुलीने आपल्या संघाचे सलामीवीर म्हणून केली आहे. भारताचा माजी सलामवीर विरेंद्र सेहवागला गांगुलीने आपल्या संघात स्थान दिले नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले केले. त्यावर गांगुलीने स्पष्टीकरण देखील दिले. तो म्हणाला की, सेहवागची सलामीवीर म्हणून निवड करण्यासाठी मी उत्सुक होतो. पण अॅलिस्टर कूकने आपल्या उमेदीच्या काळात दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मी सलामी जोडीसाठी डावखुऱया फलंदाजाची निवड करण्याचे ठरविले.

फोटो गॅलरी- ऑलिम्पिक स्पर्धेचे हे क्षण तुम्ही पाहिलेत का?

गांगुलीने आपल्या संघाच्या मधल्या फळीत राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुमार संगकारा, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांचा समावेश आहे. संघात सात फलंदाजांना स्थान दिले आहे, तर चार गोलंदाज गांगुलीने निवडले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅग्रा, द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांना पसंती दिली आहे, तर शेन वॉर्न आणि श्रीलंकेच्या मुरलीधरन यांच्याकडे फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सोपवली आहे.

गांगुलीचा सर्वोत्तम संघ-
मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), अलिस्टर कूक (इंग्लंड), राहुल द्रविड (भारत), सचिन तेंडुलकर (भारत), जॅक कॅलिस (द.आफ्रिका), कुमार संगकारा (श्रीलंका), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया, कर्णधार), ग्लेन मॅग्रा (ऑस्ट्रेलिया), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), मुरलीधरन (श्रीलंका), डेल स्टेन (द.आफ्रिका)