भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने, संघाचा नवोदीत यष्टीरक्षक ऋषभ पंतचं कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांची यष्टीरक्षक म्हणून संघात निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यात दिनेश कार्तिकने यष्टीरक्षक म्हणून केलेली कामगिरी पाहता, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. मात्र या दौऱ्याआधी ऋषभने आपला कर्णधार विराट कोहलीकडून काही गोष्टी शिकून घेणं गरजेचं असल्याचं सौरव गांगुली म्हणाला आहे.

अवश्य वाचा – ….आणि विराट कोहली हसला

“ऋषभ पंत अतिशय गुणवान खेळाडू आहे. त्याचं यष्टीरक्षण आणि धावा काढण्याचं कौशल्य या बाबी खरंच दाद देण्यासारख्या आहेत. मात्र त्याला अजुन काही गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. आपला कर्णधार विराट कोहलीकडून त्याने काही गोष्टी जरुर शिकाव्यात. आपला खेळ साधा व सोपा कसा ठेवायचा याचं उत्तर उदाहरण विराट कोहली आहे, ऋषभ ते लवकर आत्मसात करावं. मला आशा आहे की ऋषभ लवकरात लवकर ते शिकून घेईल.” टाइम्स ऑफ इंडियामधील आपल्या सदरात सौरव बोलत होता.

“ब्रिस्बेन टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली. या विजयासाठी ऑस्ट्रेलियाने स्वतःला भाग्यशाली समजायला हवं. भारत या सामन्यात विजयपथावर असतानाच ऋषभ पंतने खेळलेल्या चुकीच्या फटक्यामुळे सामना ऑस्ट्रेलियाच्या दिशेने फिरला.” याचसोबत सौरव गांगुलीने टी-20 सामन्यांच्या आयोजनाबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे.