आसिफ अलीच्या नाबाद खेळीच्या जोरावर जमैका तलायव्हाजने कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) स्पर्धेत गुणांचे खाते उघडले. सेंट ल्युसिया झोक्सने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १५८ धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना अलीने २७ चेंडूंत ४७ धावांची नाबाद खेळी केली आणि १९व्या षटकातच सामना खिशात घातला. पाकिस्तानच्या आसिफ अलीला त्याच्या प्रभावी खेळीमुळे सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

आसिफ अलीला सामन्यानंतरच्या समारंभात सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्यावेळी त्याची एक छोटी मुलाखत घेण्यात आली. याप्रसंगी एक झकास असा किस्सा घडला. आसिफला इंग्रजी भाषा समजत असली तरी इंग्रजीत बोलण्याबाबत तो तितका सक्षम नव्हता. त्यामुळे त्याने आपले उत्तर हिंदी भाषेतच देणं पसंत केलं.

महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी त्याचा तलायव्हाज संघातील सहकारी आणि नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिचन्ने याने त्याला सहकार्य केले. त्याने दिलेली उत्तरे संदीपने इंग्रजी भाषेत भाषांतरित करून अँकर आणि आसिफ यांच्यातील भाषेची दरी भरून काढली. संदीपच्या या कृत्याचे नेटिझन्सने तोंडभरून कौतुक केलं. स्वत:हून आपल्या संघातील सहकाऱ्याचा विश्वास वाढवण्याची आणि खिलाडूवृत्ती दाखवण्याची त्याने केलेली कृती साऱ्यांचाच पसंतीस उतरली.

दरम्यान, सेंट ल्युसिया झोक्सकडून रॉस्टन चेसने सर्वाधिक ५२ धावा केल्या. तर परमॉल आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी टिपले. त्यानंतर आसिफ अलीच्या सर्वाधिक नाबाद ४७ धावांच्या खेळीने जमैका तलायव्हाज विजयी संघ ठरला. केजरिक विल्यम्सने २ बळी घेतले.