राज्यातील ४०-५० टक्के दुकाने बंद होण्याची भीती

तुषार वैती, मुंबई</strong>

दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देशात एकच करप्रणाली म्हणजे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आल्यानंतर क्रीडासाहित्याच्या विक्रीला मोठा फटका बसला होता. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणला असला तरी क्रीडासाहित्याची विक्री मंदावल्याची भावना व्यापारीवर्ग व्यक्त करत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या २-३ वर्षांत राज्यातील क्रीडासाहित्याशी निगडित ४० ते ५० टक्के रोजगार बंद होण्याची भीती व्यापारीवर्ग व्यक्त करत आहे. परिणामी खेळाडूंच्या संख्येतही घट होत चालल्याचे चित्र आहे.

पूर्वी क्रीडासाहित्यावर लागणारा ५ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) थेट २८ टक्क्यांवर गेल्याने क्रीडसाहित्याचे उत्पादक, व्यापारी आणि विक्रेत्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. क्रीडासाहित्याच्या विक्रीत जवळपास ४० टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. आता सरकारने जीएसटीत १० टक्क्यांची कपात करून व्यापारीवर्गाला दिलासा दिला असला तरी खेळाडू, शाळा-महाविद्यलये, क्रीडा संघटना, प्रशिक्षण संस्थांनी क्रीडासाहित्याची खरेदी करण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लेझिम आणि देशी खेळांच्या साहित्यावरही १८ टक्के जीएसटी लागू होत असल्याने मागणीत कमालीची घट झाली आहे. परिणामी, उत्पादक आणि दुकानांमध्ये हे साहित्य तसेच्या तसे पडून आहे.

एकीकडे ‘खेलो इंडिया’च्या नावाखाली केंद्र सरकार खेळण्यासाठी भाग पाडत असले तरी क्रीडासाहित्याचे भाव अवाच्यासवा वाढले आहेत. त्यामुळे खेळाडू, शाळा-महाविद्यालयाच्या अर्थसंकल्पावर मोठा फटका बसत आहे. त्यामुळे यासारख्या उपक्रमांमधून प्रोत्साहित होण्याऐवजी खेळाडूंमध्ये निरुत्साह वाढत असल्याची भावना व्यापारीवर्ग व्यक्त करीत आहे. निश्चलनीकरण, जीएसटी आणि ऑनलाइन कंपन्यांकडून दिली जाणारी भरघोस सूट यामुळेही व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जवळपास ७०-८० वर्षे धोबीतलाव क्रीडासाहित्याच्या विक्री-खरेदीचे केंद्रबिंदू होते. पण गेल्या १०-१५ वर्षांत संपूर्ण राज्यभरात दुकानांची संख्या वाढत गेली. आता ‘जीएसटी’मुळे विक्री मंदावल्यामुळे दुकानाचे भाडे मालकांना परवडत नाही. परिणामी ४० ते ५० टक्के क्रीडादुकाने बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच उत्पादकांकडील मालाला मागणी नसल्यामुळे माल साठा वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांच्याकडील नोकऱ्या बंद होण्याची भीती आहे.

क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारांना फटका

‘जीएसटी’ लागू करण्यात आल्याचा फटका सर्वच क्रीडा प्रकारांना बसला आहे. भालाफेक, उंचउडी, थाळीफेक यांसह बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट या खेळांना जीएसटीचा मोठा फटका बसत आहे. अनेक कॉर्पोरेट कंपन्या, शाळा-महाविद्यालये अ‍ॅथलेटिक्स या क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देत असल्यामुळे अ‍ॅथलेटिक्सच्या विक्रीत फारसा परिणाम जाणवला नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

२०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर आम्हाला मोठाच धक्का बसला. क्रीडासाहित्याचा समावेश आरामदायी वस्तूंमध्ये करण्यात आल्यामुळे क्रीडासाहित्याची विक्री कमालीची मंदावली होती. केंद्र सरकारने दीड वर्षांने ‘जीएसटी’त १० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला असला, तरी तो याआधीच घ्यायला हवा होता. सरकार क्रीडा प्रकारांची थट्टा करीत आहे!

– मनोहर वागळे, महाराष्ट्र स्पोर्ट्स 

अँड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष