खेळाने आपल्याला मिळवून दिलेली कीर्ती व आर्थिक स्थैर्य लक्षात ठेवूनच ज्येष्ठ अ‍ॅथलेट्सनी आगामी कुमारांची जिल्हा मैदानी स्पर्धेस आर्थिक सहकार्य केले आहे. गुरुबन्स कौर, स्नेहल खैरे, सोनिया शिंदे, दत्ता सरडे, शिवाजीराव बुचडे, अनिल पवार, अ‍ॅड. सुशील मंचरकर या ज्येष्ठ खेळाडूंनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. ही स्पर्धा येथे २६ ते २९ जून या कालावधीत सणस मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा १४, १६, १८ व २० वर्षांखालील मुले व मुली या गटांत होणार आहे. या स्पर्धेत ४० संघांचे ६५० खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामध्ये अर्चना आढाव, अंकिता गोसावी, सिद्धी हिरे, मानसी पेंढारकर या आंतरराष्ट्रीय खेळाडू, सुमीत जैस्वाल, अफताब आलम, सर्फराझ नवाझ, चंद्रकांत झगडे, जुईली बधे, चारुशीला चिंचकर आदी राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेतून आगामी राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघांची निवड केली जाणार आहे. निवड समितीत सुधांशु खैरे, निवृत्ती काळभोर, रेश्मा पाटील-व्हनमाने, हर्षल निकम, भाग्यश्री शिर्के यांचा समावेश आहे.

राज्य बास्केटबॉल स्पर्धेत पुण्याच्या मुली विजेत्या
पुणे : नाशिक येथे नुकत्याच झालेल्या १६ वर्षांखालील गटाच्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेतील मुलींच्या गटात पुण्याने विजेतेपद मिळविले. त्यांनी अंतिम लढतीत उत्तर मुंबई संघावर ६७-४९ अशी मात केली. पूर्वार्धात पुण्याकडे २८-२७ अशी केवळ एक गुणाची आघाडी होती. उत्तरार्धात त्यांनी वेगवान खेळ करीत विजय मिळविला. पुण्याच्या विजयात श्रुती शेरीगर, उन्नती गिरी, रेवा काणे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. उत्तर मुंबई संघाच्या शेरील डेनिस व अ‍ॅलिसा टंडन यांची लढत अपुरी ठरली.

क्वीन्सलंड मोटार रॅलीत संजय टकलेस तिसरे स्थान
पुणे : क्वीन्सलंडमध्ये नुकत्याच झालेल्या मोटार रॅलीत येथील खेळाडू संजय टकले याने प्रॉडक्शन विभागात तिसरे स्थान पटकाविले. त्याने या स्पर्धेत शॉन ग्रेगरी याच्या साथीत भाग घेतला. त्यांना एकूणात सहावे स्थान मिळाले. स्कोडा संघाच्या यान कोपस्की व पॉव्हेल ड्रेसलर यांनी विजेतेपद मिळविले. पॅसिफिक रॅली मालिकेतील अगोदरच्या दोन स्पर्धामध्ये संजय याला तांत्रिक कारणास्तव पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळविता आले नव्हते. या मालिकेतील आणखी तीन रॅली बाकी आहेत. त्यापैकी मलेशियन रॅली ऑगस्टमध्ये आयोजित केली जाणार आहे.

स्नूकर स्पर्धेत पूना क्लब ‘ब’ संघाची आगेकूच
पुणे : पूना क्लब ‘ब’ संघाने लागोपाठ दोन सामने जिंकून हडपसर येथील टर्फ क्लब येथे सुरू असलेल्या आंतर क्लब स्नूकर स्पर्धेत आगेकूच राखली. पूना क्लबने पहिल्या सामन्यात रॉयल कॅनॉट बोट क्लब ‘ब’ संघावर ३-० असा विजय मिळविला. पाठोपाठ त्यांनी पीवायसी हसलर्स संघावर ३-० असा विजय मिळविला. विजयी संघाकडून सुरज राठी व राजीव खांडके यांची कामगिरी कौतुकास्पद ठरली. डेक्कन जिमखाना ‘अ’ संघाने कॉर्नर पॉकेट्स ‘अ’ संघाचा २-१ असा पराभव केला. त्या वेळी त्यांच्याकडून गौरव पतंगे, अमोल अब्दागिरी व सागर शेलार हे चमकले. पीवायसी जायंट्स संघाने रॉयल कॅनॉट बोट क्लब ‘क’ संघाला २-१ असे पराभूत केले. कॉर्नर पॉकेट्स ‘ब’ संघाने कोल्हापूरच्या फायरबॉल संघाचा ३-० असा दणदणीत पराभव केला. त्याचे श्रेय चिंतामणी जाधव याला द्यावे लागेल. पीवायसी वॉरियर्स संघाने पलाझो संघावर ३-० अशी मात केली. त्या वेळी विजयी संघाकडून आदित्य देशपांडे याने उल्लेखनीय खेळ केला.

शालेय क्रीडा स्पर्धाबाबत शुक्रवारी सभेचे आयोजन
पुणे : जिल्हा क्रीडा परिषद, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यातर्फे शालेय व महिला क्रीडा स्पर्धाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाच्या विविध स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका निश्चित करण्यासाठी २६ जून रोजी मॉडर्न प्रशाला (शिवाजीनगर) येथे सकाळी ११ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेस सर्व खेळांच्या संघटकांनी व क्रीडाशिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.