आयपीएल स्पर्धेतील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी काही आरोपींच्या शोधाकरिता धडक मोहीम सुरू केली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी त्यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध पकड वॉरंट काढले असल्याचे समजते.
या संदर्भात पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या सर्व सामन्यांच्या प्रक्षेपणाच्या कॅसेट्स सेट मॅक्सकडून मागवल्या आहेत. कोणाविरुद्ध पकड वॉरंट काढले आहे, याचा तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. त्याकरिता पोलिसांनी सेट मॅक्सच्या सिंगापूरमधील मुख्यालयाशी संपर्क साधला आहे. अन्य काही फ्रँचाईजीच्या खेळाडूंचा व व्यवस्थापनाचा या प्रकरणात हात आहे, काय याचीही चाचपणी ते करीत आहेत. आणखी आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी दक्षिण भारतात आपल्या अधिकाऱ्यांना पाठविले असल्याचेही समजते. आतापर्यंत पोलिसांनी अजित चंडिला, एस. श्रीशांत व अंकित चव्हाण या तीन खेळाडूंसह १८ लोकांना ताब्यात घेतले आहे.