इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळवण्यासाठी चुरस

अहमदाबाद : मायदेशात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या संघबांधणीच्या दृष्टिकोनातून इंग्लंडविरुद्धच्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेकडे पाहिले जात आहे. ही संघबांधणी करताना शिखर धवन की के. एल. राहुल, दीपक चहर की भुवनेश्वर कुमार आणि श्रेयस अय्यर की सूर्यकुमार यादव असे पेच भारतीय संघ व्यवस्थापनापुढे उभे ठाकले आहेत.

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी १९ खेळाडू उपलब्ध असून, काही स्थानांसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे विश्वचषकासाठी सहा-सात महिने बाकी असताना कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री या मालिकेकडे गांभीर्याने पाहात आहेत.

भारताचा नियमित ट्वेन्टी-२० संघ खेळवून मालिका विजयानंतर प्रयोग करण्याचा एक मार्ग उपलब्ध आहे, तसेच पूर्णत: नव्याने संघरचना करण्याचा दुसरा मार्ग उपलब्ध आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच पाचही सामने होणार असल्यामुळे पहिल्या तीन सामन्यांसाठी संघरचनेत बदल होण्याची शक्यता कमी आहे.

धवन सलामीला, राहुल मधल्या फळीत?

ऋषभ पंतच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आघाडीच्या फळीत बदल होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील प्रथमपसंतीचा यष्टीरक्षक गणल्या जाणाऱ्या के. एल. राहुलऐवजी यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतकडे जाईल. शिखर धवन आणि रोहित शर्मा हे सलामीला उपलब्ध असले, तरी राहुल सलामीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. परंतु धवनने विजय हजारे करंडक स्पध्रेत दिल्लीकडून चमकदार कामगिरी बजावली आहे. त्यामुळे राहुलला मधल्या फळीत चौथ्या अथवा पाचव्या क्रमांकावर स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरणार, हे पक्के आहे.

ट्वेन्टी-२०मध्येही फिरकीचे त्रिकूट?

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन होत आहे. त्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर यांच्यात स्पर्धा असेल. हाणामारीच्या षटकांत चहर टिच्चून गोलंदाजी करतो. मोटेराच्या खेळपट्टीवर यजुर्वेद्र  चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे फिरकी गोलंदाजांचे त्रिकूट इंग्लिश फलंदाजांवर अंकुश ठेवेल. टी. नटराजन या यॉर्कर विशेषज्ञ गोलंदाजाचा पर्यायही उपलब्ध आहे. त्याला नवदीप सैनीचे आव्हान असेल. मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमरा या भरवशाच्या गोलंदाजांना इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी विश्रांती दिली जात असल्याने अन्य खेळाडूंना आजमावण्याची संधी मिळेल.

मधल्या फळीत तीव्र स्पर्धा

मधल्या फळीतील स्पर्धा आता वाढली आहे. चौथ्या क्रमांकासाठी राहुल, श्रेयस आणि सूर्यकुमार यांच्यापैकी एकाची वर्णी लागेल. या स्थितीत श्रेयस आणि सूर्यकुमार यांच्यापैकी एकालाच संधी मिळेल, तर सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर पंत आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा या खेळाडूंना स्थान मिळू शकते.