न्यूझीलंड-बांगलादेश एकदिवसीय मालिका

तिसऱ्या लढतीच्या विजयात साऊदी आणि टेलरची चमक

टिम साऊदीचे सहा बळी आणि रॉस टेलरचा विक्रम या बळावर न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले.

न्यूझीलंडच्या ३३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचे पहिले तीन फलंदाज फक्त दोन धावांत तंबूत परतले. मात्र शब्बीर रेहमानने पहिलेवहिले शतक झळकावून बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशचा डाव ४७.२ षटकांत २४२ धावांत आटोपला. वेगवान गोलंदाज साऊदीने ६५ धावांत सहा बळी घेत आगामी विश्वचषकाची दावेदारी मजबूत केली आहे.

टेलरने ८१ चेंडूंत ६९ धावांची खेळी साकारली असून, एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. स्टीफन फ्लेमिंगच्या खात्यावर ८००७ धावा आहेत. मात्र टेलरने ४८.३४ धावांच्या सरासरीने २०३व्या डावात एकंदर ८०२६ धावा काढताना हा विक्रम मोडीत काढला. टेलरने २००६मध्ये पदार्पण केले होते.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : ५० षटकांत ६ बाद ३३० (रॉस टेलर ६९, हेन्री निकोल्स ६४; मुस्ताफिझूर रेहमान २/९३) विजयी वि. बांगलादेश : ४७.२ षटकांमध्ये सर्व संघ बाद २४२ (शब्बीर रेहमान १०२; टिम साऊदी ६/६५)

सामनावीर : टिम साऊदी.

मालिकावीर : मार्टिन गप्टिल.