भारत आणि चीन यांच्यादरम्यान सीमेवरील तणावही दिवसोंदिवस वाढत आहे. भारतीयांनी चीनी वस्तुंच्या वापरावर बहिष्कार टाकला पाहिजे, असा सूर सध्या देशभरात घुमताना दिसतो आहे. प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी स्वदेशीचा नारा दिल्यापासून या मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर व्हा’ या सूचनेनुसार भारतीय अ‍ॅप वापरत चीनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही अनेकांनी केलं होतं. सोशल मिडियाच्या माध्यमातूनही या संदर्भात आवाहन केलं जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना अभिनेता मिलिंद सोमण यानेही, आपण आता टिक टॉकवर नाही, असं स्पष्ट केलं होतं. पण या साऱ्या गोष्टींदरम्यान या मोहिमेला गालबोट लागले आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिला या मोहिमेदरम्यान एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. ज्वाला गुट्टाने आपल्या इन्साग्राम स्टोरीवर स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर एका युझरने कमेंट करत ज्वाला गुट्टाला चिनी संबोधण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा स्क्रीनशॉट ज्वाला गुट्टाने आपल्या ट्विटरवर शेअर केला. ‘ही मोहिम नक्की कोणत्या दिशेने जाते आहे ते पाहा’, असं कॅप्शन लिहित ज्वालाने आपला राग व्यक्त केला.

ज्वाला गुट्टाचा रुद्रावतार या आधीदेखील दिसला होता. भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमावर निशाणा साधत एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यानंतर बबिताला काही नेटकऱ्यांनी दहशतवादी संबोधलं होतं. त्यावरून ज्वाला गुट्टा प्रचंड भडकली होती. एका युझरला बबितासोबत जोडण्यात आलेला दहशतवादी हॅशटॅग डिलीट करण्याची ताकीददेखील तिने दिली होती.