बार्सिलोनाचा दिमाखदार विजय

लुइस सुआरेझच्या सुरेख हॅट्ट्रिकच्या जोरावर बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेत ऐबार संघावर ३-१ असा विजय मिळवला. या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत रिअल माद्रिदच्या २१ गुणांशी बरोबरी केली आहे. गोलफरकाच्या बळावर रिअल माद्रिदचा संघ अव्वल स्थानी आहे.
बार्सिलोनाच्या तुलनेत नवख्या ऐबार संघातर्फे दहाव्या मिनिटालाच बोर्जा बॅस्टनने गोल करत खाते उघडले. मात्र काही मिनिटांतच अचूक हेडरच्या बळावर सुआरेझने बार्सिलोनाला बरोबरी करून दिली. पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी बार्सिलोनाच्या जेव्हियर मस्करेन्होला रेड कार्ड दाखवण्यात आले. यामुळे बार्सिलोनाचे आक्रमण कमकुवत झाले, मात्र त्याच वेळी ऐबारची ताकद वाढली. मेस्सीच्या अनुपस्थितीचा कोणताही परिणाम होऊ न देता सुआरेझने मध्यंतरानंतर लगेचच शानदार गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली.
ऐबार संघाने बचावावर लक्ष केंद्रित करत बार्सिलोनाच्या आक्रमणाला थोपवले. मात्र गोल करण्यात त्यांना अपयश आले. सामना संपायला पाच मिनिटे असताना सुआरेझने हॅट्ट्कि नोंदवली आणि बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह बार्सिलोनाने तीन गुण पटकावले.
अन्य लढतींमध्ये अ‍ॅटलेटिको माद्रिदने व्हॅलेन्सिआवर २-१ अशी मात केली. अ‍ॅटलेटिकोतर्फे मार्टिनेझ आणि फेरीरा कारासो यांनी प्रत्येकी एक गोल केला. रिअल सोसिदादने लेव्हान्टेचा ४-० असा धुव्वा उडवला.