|| तुषार वैती

गेली तीन वर्षे अतिशय गुप्तपणे जगातील सर्वात सामथ्र्यवान क्लब युरोपियन सुपर लीगची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील होते. युरोपातील विद्यमान फुटबॉल संकल्पनेशी बंडखोरी करत त्यांनी आपली नवी चूल पेटवण्याचे ठरवले. गेल्या रविवारी सुपर लीगची संकल्पना जगजाहीर झाल्यानंतर युरोपियन फुटबॉलमध्ये एक वादळ निर्माण झाले. आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या महासंकटाची चाहूल लागल्यानंतर युरोपियन फुटबॉल महासंघ (यूएफा) आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) खडबडून जागे झाले. अखेर राजकीय आणि चाहत्यांच्या दबावाखाली सुपर लीगचा गाशा दोन दिवसांत गुंडाळावा लागला.

करोनाच्या काळात गेल्या वर्षभरात सर्वच फुटबॉल क्लबचे कंबरडे मोडले असताना सुपर लीगच्या संकल्पनेद्वारे मोठ्या प्रतिष्ठित क्लब्जना आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनवण्याची योजना तयार करण्यात आली. सुपर लीगच्या संकल्पनामुळे जवळपास १०० वर्षे जुन्या असलेल्या चॅम्पियन्स लीगसारख्या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेची व्यवहार्यता धोक्यात आली होती.

जेपी मॉर्गनसारखी अमेरिकेतील आणि माद्रिदमधील की कॅपिटल पार्टनर्स यांसारख्या नामांकित वित्तसंस्था पाठीशी उभ्या राहिल्यामुळे इंग्लंड, स्पेन आणि इटलीतील १२ प्रतिष्ठित क्लब्जनी सुपर लीगच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत युरोपियन फुटबॉलमधील शेकडो वर्षांच्या संकल्पनेशी तसेच चाहत्यांशी बंडखोरी करण्याचे धाडस केले. चेल्सी, लिव्हरपूल, आर्सेनल, मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी, टॉटेनहॅम, एसी मिलान, इंटर मिलान, युव्हेंटस, रेयाल माद्रिद, बार्सिलोना, अ‍ॅटलेटिको माद्रिद यांसारख्या क्लब्जनी सुपर लीगशी करार केला. १५ कायमस्वरूपी सदस्यांसह जगातील अन्य पाच नामांकित क्लबना समाविष्ट करून घेत, सोमवार ते शुक्रवार फुटबॉल चाहत्यांना अवर्णनीय आनंद देण्याची योजना आखण्यात आली होती. फ्रान्समधील पॅरिस सेंट-जर्मेन आणि पोर्तुगालमधील एफसी पोर्टो हेसुद्धा सुपर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक होते. जर्मनीतील बायर्न म्युनिकसारख्या अव्वल संघाने मात्र युरोपियन फुटबॉलशी प्रामाणिक राहण्याचे ठरवले होते. २० संघांची दोन गटांत विभागणी करून प्रत्येकी १० संघ एकमेकांशी होम आणि अवे पद्धतीनुसार लढणार होते. प्रत्येक गटातील अव्वल चार संघ बाद फेरीतील प्रवेश करून नंतर विजेतेपदासाठी झुंजणार होते.

आपापल्या राष्ट्रीय लीगमध्ये (इंग्लिश प्रीमियर, ला-लीगा, सेरी-ए, बुंडेसलीगा, फ्रेंच लीग-१ यांसह अन्य) चमकदार कामगिरी करणाऱ्या संघांनाच चॅम्पियन्स लीगमध्ये दरवर्षी स्थान मिळते; पण सुपर लीगमध्ये सर्व क्लब्जना कायम ठेवत त्यांच्या आर्थिक मिळकतीला कोणताही धक्का न लावण्याची योजना होती. विशेष म्हणजे चॅम्पियन्स लीगमधील विजेत्या संघाच्या तुलनेत प्रत्येक संघाची चारपट कमाई होणार होती. त्याचबरोबर प्रक्षेपण हक्क आणि जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक संघ मालामाल होणार होता. त्यामुळे सोन्याचे अंडे देणाऱ्या सुपर लीगच्या कोंबडीचा लाभ आपल्यालाही हवा, असेच प्रत्येकाला वाटत होते.

ज्यांच्या बळावर युरोपियन फुटबॉलची लोकप्रियता टिकून आहे, असे जगातील २० अव्वल संघ एकाच छत्रछायेखाली आल्यानंतर चाहत्यांनाही फुटबॉलची मेजवानी मिळेल, असा समज संयोजकांचा होता. चाहत्यांना काय हवे, याचा विचार कुणीही केला नव्हता; पण प्रत्येक क्लबची प्रदीर्घ वाटचाल, परंपरा, संस्कृतीशी प्रामाणिकपणे जोडले गेलेल्या चाहत्यांच्या विश्वासाला सुपर लीगमुळे धक्का पोहोचला. त्यामुळेच ही नवी संकल्पना पचनी न पडल्याने ब्रिटनमध्ये अनेक चाहत्यांनी एकत्र येत ‘फुटबॉलचा मृत्यू जवळ आला आहे,’ अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.

चाहतेच नव्हे, तर या संघांची भिस्त ज्या खेळाडू आणि प्रशिक्षकांवर आहे, त्यांनीही या नव्या संकल्पनेला विरोध केला. माजी खेळाडू, फुटबॉलमधील महान खेळाडू तसेच जाणकार मंडळींनी या संकल्पनेला कडाडून विरोध केला. ‘‘आम्हाला ही संकल्पना आवडली नाही. ती प्रत्यक्षात साकार होऊ नये,’’ असे वक्तव्य लिव्हरपूलचा मध्यरक्षक जॉर्डन हेंडरसनने संघातील सर्व खेळाडूंच्या वतीने केले. मँचेस्टर युनायटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईड वूडवर्ड, चेल्सीचे अध्यक्ष ब्रूक बक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गाय लारेन्स यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला. लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेडच्या चाहत्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणला. श्रीमंतीचा थाट अनुभवणारे मोजकेच संघ गर्भश्रीमंत होणार असल्याने छोट्या-मोठ्या क्लब्जनीही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी दबाव आणला.

‘यूएफा’ आणि ‘फिफा’ने सुपर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या संघांना चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यावर तसेच या संघातील खेळाडूंना विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यावर बंदी आणण्याचा तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजकीय दबावापोटी तसेच चाहत्यांच्या रोषामुळे एका रात्रीत सूत्रे हलली आणि इंग्लिश प्रीमियर लीगमधील सहा क्लब्जनी सुपर लीगमधून माघार घेतली. त्यानंतर रेयाल माद्रिद आणि बार्सिलोना वगळता उर्वरित १० संघ माघारी परतल्यामुळे सुपर लीगची संकल्पना अखेर मोडीत निघाली. सुपर लीगच्या भ्रमाचा भोपळा फुटला असला तरी भविष्यात अशा प्रकारची अनेक संकटे उभी राहू शकतात. त्यामुळे जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलच्या लोकप्रियतेचा आलेख खालावल्यास आश्चर्य वाटायला नको.

tushar.vaity@expressindia.com