काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. यात भारताचे ४०हून जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर १२ दिवसांनी आज, मंगळवारी भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली. भारतीय वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडे तीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हजार किलोचा बॉम्ब फेकले आणि तळ उध्वस्त केले. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जात आहे.

या नंतर भारतीय वायुसेनेचे, सैन्याचे आणि सरकारचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दरम्यान गेल्या काही दिवस भारत – पाक मुद्द्यावर आक्रमकपणे व्यक्त होणाऱ्या भारताचा फिरकीपटू युझवेन्द्र चहल यानेही ट्विट करून भारतीय वायुसेनेच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे. त्याने ट्विट मध्ये भारतीय वायुसेनेचे नाव लिहून त्यांना नमस्कार केला आहे. तसेच ‘गली बॉय’ चित्रपटातील लोकप्रिय संवाद ”बोहोत हार्ड” असे ट्विट करत त्याने वायुसेनेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

याशिवाय, कायम कल्पक ट्विट करण्यात प्रसिद्ध असलेल्या सेहवागनेही ट्विट करून वायुसेनेचे कौतुक केले आहे. ‘The boys have played really well’, या वाक्यावरून अनेकदा पाकिस्तानचे क्रिकेटपटू ट्रोल झाले आहेत. हेच वाक्य वापरून भारतीय वायुदलाच्या कामगिरीचे सेहवागने कौतुक केले आहे. तसेच ”सुधर जाओ वरना सुधार देंगे” हा हॅशटॅगशी सेहवागने ट्विट केला आहे.

तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी लोक LOC चे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्याचे वृत्त मान्य केले आहे.