कर्णधार सूर्यकुमार यादवने साकारलेल्या आणखी एका धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर मुंबईने मंगळवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुद्दुचेरीचा २७ धावांनी पराभव केला. ‘ड’ गटात अग्रस्थानी विराजमान असलेल्या यजमान मुंबईचा हा सलग चौथा विजय ठरला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ६ बाद १७१ धावा केल्या. या वेळी सलामीवीर जय बिश्त (२९) व आदित्य तरे (२०) लवकर बाद झाले. श्रेयस अय्यरही (१९) फारशी चमक दाखवू शकला नाही.

परंतु कर्णधार सूर्यकुमार फलंदाजीला येताच सामन्याचा नूर पालटला. सूर्यकुमारने अनुभवी सिद्धेश लाडसह चौथ्या गडय़ासाठी ६५ धावांची भागीदारी रचली. डावाच्या अखेरच्या षटकातील लागोपाठच्या दोन चेंडूंवर सागर त्रिवेदीने अनुक्रमे सूर्यकुमार आणि सिद्धेशला बाद केले. सूर्यकुमारने ३७ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ५७ धावा फटकावल्या. सिद्धेशने २२ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह ३९ धावा केल्या. या दोघांमुळेच मुंबईला पावणेदोनशे धावांच्या जवळ पोहोचता आले.

प्रत्युत्तरात पारस डोग्रा (४५) आणि सुब्रमणियम आनंद (३९) यांनी पुद्दुचेरीतर्फे झुंजार खेळी केली. परंतु शाम्स मुलानी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून इतर फलंदाजांवर अंकुश ठेवल्यामुळे पुद्दुचेरीला २० षटकांत ७ बाद १४४ धावांपर्यंतच मजल मारता आली. बुधवारी विश्रांतीचा दिवस असून गुरुवारी बंगालविरुद्ध रंगणाऱ्या सामन्यात सरशी साधून मुंबई विजयाचे पंचक पूर्ण करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

२  सूर्यकुमार यादवने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकावले. हरयाणाविरुद्ध त्याने ३८ चेंडूंत ८१ धावांची खेळी साकारली होती.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : २० षटकांत ६ बाद १७१ (सूर्यकुमार यादव ५७, सिद्धेश लाड ३९; सागर त्रिवेदी ४/२९) विजयी वि. पुद्दुचेरी : २० षटकांत ७ बाद १४४ (पारस डोग्रा ४५, सुब्रमणियम आनंद ३९; शाम्स मुलानी २/२५).

गुण : मुंबई ४, पुद्दुचेरी ०

महाराष्ट्राला पराभवाचा धक्का

चंडीगड : कर्णधार हरप्रीत सिंग (नाबाद ८८) आणि सलामीवीर शशांक चंद्रकार (८०) यांच्या तुफानी अर्धशतकांच्या बळावर छत्तीसगडने मंगळवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला ३४ धावांनी पराभूत केले. ‘क’ गटात समावेश असलेल्या यजमान चंडीगडचा हा सलग चौथा विजय ठरला. चंडीगडने २० षटकांत ३ बाद २०१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात महाराष्ट्राचा डाव २० षटकांत १६७ धावांत संपुष्टात आला. ऋतुराज गायकवाड (६१) आणि यष्टिरक्षक नौशाद शेख (५२) यांनी महाराष्ट्राचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केले.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड : २० षटकांत ३ बाद २०१ (हरप्रीत सिंग नाबाद ८८, शशांक चंद्रकार ८०; सत्यजित बच्छाव १/२७) विजयी वि. महाराष्ट्र : २० षटकांत सर्व बाद १६७ (ऋतुराज गायकवाड ६१, नौशाद शेख ५२; अजय मंडाल ३/१९).

गुण : छत्तीसगड ४, महाराष्ट्र ०