भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ टी२०, ३ वन डे आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी BCCIने IPL2020 सुरू असतानाच संघ जाहीर केला. त्या संघात मुंबई इंडियन्सकडून कामगिरीत सातत्य राखणाऱ्या सूर्यकुमारला वगळण्यात आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. क्रिकेट जाणकारांपासून ते चाहत्यांपर्यंत साऱ्यांनीच निवड समितीच्या या निर्णयावर टीका केली, पण सूर्यकुमार यादव स्वत: या संदर्भात काहीही बोलला नव्हता. अखेर एका मुलाखतीत त्याने या मुद्द्याबाबत मौन सोडलं.

“अगदी खरं सांगायचं तर मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात निवडला जाईन अशी माझी अपेक्षा होती. जेव्हा मला संघात स्थान मिळालं नसल्याचं समजलं, तेव्हा मला खूपच खिन्न आणि उदास वाटलं. त्या दिवशी मला सरावदेखील करता येत नव्हता. मला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यापासून नाकारण्यात आलंय ही भावनाच माझ्या मनातून जात नव्हती. माझी तशी अवस्था पाहून रोहितनेदेखील मला विचारलं होतं की संघातून वगळल्याबद्दल मला वाईट वाटतंय का? त्यावर मी त्याला खरं उत्तरही सांगून टाकलं होते. पण जे झालं ते झालं. आता मी संधीची वाट पाहतोय. माझी क्रिकेटमधील प्रतिभा दाखवण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ आहे. त्या वेळेचा सदुपयोग करून मी संघात स्थान मिळण्यासाठी आणखी प्रबळ दावेदार ठरेन. आताच्या देशांतर्गत स्पर्धा आणि पुढच्या वर्षीच्या IPL मध्ये मी नक्कीच चांगली कामगिरी करेन आणि निवड समितीचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरेन”, असा विश्वास सूर्यकुमारने हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

सूर्यकुमार यादव[/caption]

“संघात खेळाडू निवडणं हे माझ्या हातात नाही. त्यामुळे त्याबाबतीत मी फारसा विचार करत नाही. मला सचिन तेंडुलकर पाजींनीही सांगितलं आहे की तू तुझा खेळ खेळत राहा आणि धावा जमवत राहा. आता मी त्याच गोष्टीप्रमाणे वागतोय. मला मिळालेली प्रत्येक संधी मला चांगल्या कामगिरीसाठी वापरायची आहे. आता माझं लक्ष्य टी२० विश्वचषक स्पर्धेच्या संघात मिळवणं हे असणार आहे”, असंही त्याने स्पष्ट केलं.