क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अनेकदा मैदानामध्ये होणाऱ्या घडामोडी पाहून या खेळात काहीही होऊ शकतं यावर विश्वास बसतो. असच काहीसं झालं बँकॉकमध्ये सुरु असणाऱ्या थायलंड महिला टी-२० स्मॅश स्पर्धेमध्ये. चीन आणि युएईचे संघ मैदानात एकमेकांसमोर उतरले आणि हा सामना ऐतिहासिक ठरला. कारण ११ खेळाडूंनी फलंदाजी करुनही चीनच्या संघाला केवळ १४ धावा करता आल्या. त्यामुळे चीनच्या महिला संघाच्या नावावर एक नकोश्या विक्रमाची नोंद झाली तर दुसरीकडे युएई संघाने त्यांचा सर्वात मोठा विजय मिळवला.

चीनचा संपूर्ण संघ एवघ्या १४ धावांत बाद झाल्याने ही महिला टी-२० क्रिकेटमधली सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. युएईच्या गोलंदाजांपुढे चीनचे फलंदाज तग धरु शकले नाहीत आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या युएईने १८९ धावांनी हा सामना जिंकला. टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या युएईच्या संघाने चीनच्या गोलंदाजीची पिसे काढली. २० षटकांमध्ये तीन गड्यांच्या मोबदल्यात युएई संघाने २०३ धावांपर्यंत मजल मारली. ही धावसंख्या युएई संघाने टी-२०मध्ये केलेली सर्वोच्चम धावसंख्या ठरली. २०३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चीनच्या संघामधील सात फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये निवड होण्यासाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत युएई, नेपाळ, चीन, भूतान, इंडोनेशियाचे संघ एकमेकांशी स्पर्धा करताना दिसत आहेत.