नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेआधी भारतीय संघाची निवड करण्यापूर्वी सहा वेळा जगज्जेती ठरलेली बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिच्याविरुद्ध निवड चाचणी घ्यावी, अशी मागणी कनिष्ठ गटातील माजी जगज्जेती बॉक्सर निखत झरीन हिने क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

रशिया येथे नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत मेरी कोमला ५१ किलो वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मेरी कोमचे हे जागतिक स्पर्धेतील आठवे पदक ठरले. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना मेरी कोमची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता, भारतीय बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) मेरी कोमला निवड चाचणी स्पर्धेत न खेळवता थेट भारतीय संघात निवडले होते. आता जागतिक स्पर्धेतील कामगिरी पाहून बीएफआय मेरी कोमला थेट ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी पाठवणार आहे. पात्रता फेरीची स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात चीन येथे होणार आहे.

‘‘खेळात प्रत्येकाला प्रत्येक वेळी स्वत:ला सिद्ध करावे लागते. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांनाही स्वत:च्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परत झुंजावे लागते. मेरी कोमला पाहूनच मी लहानपणापासून प्रेरित झाले आहे. मेरी कोम ही बॉक्सिंगमधील महान खेळाडू आहे. पण ऑलिम्पिक पात्रतेचा अडथळा तिला पार करता आला नाही. जर २३ वेळा सुवर्णपदक विजेत्या मायकेल फेल्प्सला प्रत्येक वेळी ऑलिम्पिकसाठी पात्र व्हावे लागत असेल तर तोच कित्ता सर्वानीच गिरवायला हवा, असे मला वाटते,’’ असे पत्र झरीनने क्रीडामंत्र्यांना पाठवले आहे.