सलामीवीर तमिम इक्बालने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने अखेरच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर १८ धावांनी मात केली आहे. या विजयासह बांगलादेशने ३ सामन्यांची वन-डे मालिका २-१ ने जिंकली आहे. बांगलादेशने दिलेलं ३०२ धावांचं आव्हान वेस्ट इंडिजच्या संघाला पेलवलं नाही. बांगलादेशकडून तमिम इक्बालने १०३ तर मेहमद्दुलाने नाबाद ६७ धावा पटकावल्या.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात काहीशी अडखळती झाली. मात्र तमिम इक्बालने एकाबाजूने खिंड लढवत संघाचा डाव सावरला. आपल्या १०३ धावांच्या खेळीत तमिमने ७ चौकार आणि २ षटकार लगावले. तमिम इक्बाल माघारी परतल्यानंतर मधल्या फळीत मेहमद्दुलाने फटकेबाजी करत नाबाद ६७ धावा पटकावल्या. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर आणि अॅशले नर्सने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीर ख्रिस गेलने अर्धशतकी खेळी करत वेस्ट इंडिजच्या संघाचं आव्हान सामन्यात कायम राखलं होतं. शाई होपने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत गेलला चांगली साथ दिली. ७३ धावांवर गेल माघारी परतल्यानंतर मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांना आवश्यक धावगती राखता आली नाही. याचा फायदा घेत मधल्या षटकांमध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर वेसण घातली. मधल्या फळीत रोव्हमन पॉवेलने ४१ चेंडूत नाबाद ७४ धावांची आक्रमक खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. ५० षटकांत वेस्ट इंडिजचा संघ २८३ धावांपर्यंतच मजल मारु शकला. मंगळवारपासून दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.