Women’s T20 World Cup 2020 Ind Vs Ban : टी २० विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाने बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला. शफाली वर्मा (३९) आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने बांगलादेशला १४३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करणे बांगलादेशी फलंदाजांना शक्य झाले नाही. पूनम यादवचे ३ बळी आणि तिला शिखा पांडे, अरूंधती रेड्डी यांनी दिलेली साथ याच्या बळावर भारताने बांगलादेशला ८ बाद १२४ धावांवरच रोखले आणि स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला.

या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि विकेट किपर महेंद्रसिंग धोनी याची आठवण आणणारी एक घटना घडली. बांगलादेशच्या संघाची फलंदाजी सुरू असताना १७ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाज आली. षटकातील तिसऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या गोलंदाजाने चेंडूला मागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्याच भारताची यष्टीरक्षक तानिया भाटीया हिने धोनी-स्टाईल पाय उचलत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनेकांना धोनीची आठवण आली आणि सोशल मीडियावर लेडी MS Dhoni अशी तानियाची चर्चा रंगली.

दरम्यान, सामन्यात बांगलादेशची कर्णधार सलमा खातून हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मानधना संघात नसल्याने यष्टीरक्षक तानिया भाटीयाला सलामीवीर म्हणून बढती देण्यात आली, पण ती केवळ २ धावा करून माघारी परतली. धडाकेबाज फटकेबाजी करणारी शफाली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरली. १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकार खेचत तिने ३९ धावा केल्या आणि ती बाद झाली. संयमी खेळी करणारी मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्ज चोरटी धाव घेताना धावबाद झाली. ती ३७ चेंडूत ३४ धावा करून माघारी परतली. शेवटच्या टप्प्यात वेदा कृष्णमूर्ती हिने ४ चौकारांसह ११ चेंडूत २० धावा केल्या आणि भारताला १४२ धावांचा टप्पा गाठून दिला.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीलाच पहिलं यश मिळाला. सलामीवीर शमिमा सुलताना मोठा फटका खेळताना बाद झाली. संयमी खेळ करत भागीदारी रचताना बांगलादेशला दुसरा धक्का बसला. मुर्शिदा खातून २६ चेंडूत ३० धावा करून माघारी परतली. भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे बांगलादेशला डोकं वर काढता आलं नाही. एक बाजू लावून धरत २६ चेंडूत ३५ धावांची धडाकेबाज खेळी करणारी निगर सुलताना झेलबाद झाली. पूनम यादवने ३; शिखा पांडे, अरूंधती रेड्डीने २-२ बळी आणि गायकवाडने १ बळी टिपत बांगलादेशला २० षटकात ८ बाद १२४ धावांवरच रोखले.