सध्या सर्वत्र करोना विषाणूचा हाहा:कार माजला आहे. सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धांनाही ब्रेक लागला आहे. असे असताना टीम इंडियाला जबर धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत भारतीय संघाला खाली ढकलून अव्वल स्थान पटकावले. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे, पण गेली ४२ महिने म्हणजेच ऑक्टोबर २०१६ पासून अव्वल स्थानी असलेल्या टीम इंडियाला शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने मागे टाकले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी एकदिवसीय, कसोटी आणि टी २० अशी तीनही प्रकारच्या क्रिकेटमधील संघांची क्रमवारी जाहीर केली. त्यात इंग्लंडने एकदिवसीय क्रमावरीतील आपले अव्वल स्थान कायम राखले. तर ऑस्ट्रेलियाने कसोटी आणि टी २० मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रमवारीत भारताला तर टी २० क्रमवारीत पाकिस्तानला मात दिली आहे. पाकिस्तानचा संघदेखील तब्बल २७ महिन्यांनंतर अव्वल स्थान गमावून तिसऱ्या स्थानी ढकलला गेला आहे.

सर्व क्रीडा स्पर्धा बंद असूनही असं कसं झालं? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. त्याचं उत्तर म्हणजे ICC ने क्रिकेट स्पर्धा बंद असल्याने नवीन प्रकारे गुण दिले आहेत. मे २०१९ नंतर खेळण्यात आलेल्या सामन्यांतील १०० टक्के आणि त्या आधीच्या दोन वर्षांतील कामगिरीच्या ५० टक्के गुणांची बेरीज करून ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे. त्यामुळे भारताची तिसऱ्या आणि पाकिस्तानची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.