11 December 2017

News Flash

टीम इंडियाच्या स्पॉन्सरशिपसाठी ५३८ कोटींची किमान बोली

निविदा मागविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: February 21, 2017 5:26 PM

बीसीसीआयने संघाच्या स्पॉन्सरशीपसाठी द्वीपक्षीय मालिकेसाठी २.२ कोटी आणि आयसीसीच्या स्पर्धेसाठी ७० लाख रुपयांची बेस प्राईस ठेवली आहे.

टीम इंडियाच्या स्पॉन्सरशिपसाठीचा करार लवकरच खुला होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) संघाच्या स्पॉन्सरशिपसाठीची पायाभूत किंमत (बेस प्राईस) यावेळी तब्बल ५३८ कोटी इतकी ठेवली आहे. यासाठीची निविदा मागविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. सध्या भारतीय संघाच्या स्पॉन्सरशिपचे अधिकार स्टार इंडियाकडे आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत स्टार इंडियाची मुदत संपुष्टात येणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून पुढील पाच वर्षात भारतीय संघ एकूण २५९ सामने खेळणार आहे. यातील २३८ सामने दोन संघांमध्ये, तर २१ आयसीसीच्या स्पर्धांचे सामने आहेत. येत्या जून महिन्यात चॅम्पियन्स करंडक, तर २०१९ साली विश्वचषक आणि २०२० साली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या कालावधीत भारतीय संघाच्या टी-शर्टवर स्पॉन्सरशीपचे अधिकार मिळविण्यासाठी देशातील विविध कंपन्या उत्सुक असणार आहेत.

 

बीसीसीआयने संघाच्या स्पॉन्सरशीपसाठी द्वीपक्षीय मालिकेसाठी २.२ कोटी आणि आयसीसीच्या स्पर्धेसाठी ७० लाख रुपयांची बेस प्राईस ठेवली आहे. बेस प्राईसनुसार द्वीपक्षीय सामन्यांमधून बीसीसीआयला ५२३.६ कोटी, तर आयसीसीच्या स्पर्धांमधून १४.७ कोटींची कमाई मिळणार आहे. भारतीय संघाची गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहता संघाच्या स्पॉन्सरशिपसाठी यंदा चांगली बोली लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

बीसीसीआयच्या प्रवक्ता म्हणाला की, भारतीय संघाच्या स्पॉन्सरशिपसाठीची निविदा मागविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. इच्छुक कंपन्यांना निविदा फॉर्म भरून त्यासाठी नोंदणी करता येणार आहे. याआधी द्वीपक्षीय सामन्यांसाठीची बेस प्राईस १.५ कोटी इतकी होती, तित वाढ करून आता २.२ कोटी करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या स्पॉन्सरशिप अधिकारांसाठी यावेळी मोबाईल उत्पादन कंपन्या, टेलिकॉम आणि ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये चुरस पाहायला मिळेस असे सांगण्यात येत आहे.

First Published on February 17, 2017 5:35 pm

Web Title: team india sponsorship bcci 538 crore base price