आशियाई नेमबाजी स्पर्धा

महाराष्ट्राची अव्वल नेमबाज तेजस्विनी सावंत हिने शनिवारी भारताला ऑलिम्पिकचे १२वे स्थान मिळवून दिले. १४व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीला महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पदकापर्यंत झेप घेता आली नसली तरी तिने पुढील वर्षी रंगणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आणखी एक स्थान निश्चित केले. असे करणारी ती राही सरनोबतनंतर कोल्हापूरची दुसरी नेमबाज ठरली आहे.

अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या आठपैकी पाच जणींनी याआधीच ऑलिम्पिकचे स्थान पक्के केल्यामुळे अन्य तीनपैकी एका स्थानावर भारताला मोहोर उमटवता आली. पात्रता फेरीत ११७१ गुणांची कमाई करून पाचव्या स्थानासह ३९ वर्षीय तेजस्विनीने अंतिम फेरीत मजल मारली होती. कडवी लढत देऊनही तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिने ४३५.८ गुण मिळवले. अंतिम फेरीतील दुसऱ्या टप्प्यात तेजस्विनी तिसऱ्या स्थानी होती, पण ८.८ गुणांचा वेध घेतल्यामुळे ती मागे पडली.

२००८, २०१२ आणि २०१६ ऑलिम्पिकचे तिकीट न मिळाल्याने तेजस्विनीला आता पहिल्यांदाच ऑलिम्पिकवारी करण्याची संधी मिळणार आहे.