भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेटच्या सामन्यात रंगणारं द्वंद्व सर्व क्रिकेट प्रेमींना परिचीत आहे. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत या दोन संघांमधील सामन्यांना प्रेक्षक तुफान गर्दी करतात. काही वर्षांपूर्वी शोएब अख्तर आणि सचिन तेंडूलकर या दोन खेळाडूंमध्ये चांगलाच सामना रंगायचा. २००३ विश्वचषकात सचिनने शोएबची केलेली धुलाई सर्वांनी अनुभवली आहे. मात्र शोएबचे बाऊन्सर चेंडू खेळताना सचिन आपले डोळे बंद करायचा असा दावा माजी पाक खेळाडू मोहम्मद आसिफने केला आहे.

“२००६ साली पाकिस्तान दौऱ्यावर आलेला भारतीय संघ तुम्हाला आठवत असेल, त्या संघात सर्वोत्तम फलंदाज होते. द्रविड त्यावेळी चांगल्या धावा करत होता. मुलतानमध्ये सेहवागने आमची धुलाई केली होती. फैसलाबाद कसोटीत दोन्ही संघांनी मिळून ६०० धावा केल्या. भारतीय संघातल्या फलंदाजांना फॉर्म पाहून आम्ही थोडे चिंतेत होते. ज्यावेळी सामन्याला सुरुवात झाली त्यावेळी इरफान पठाणने पहिल्याच षटकात हॅटट्रीक घेतली आणि आमचा धीर खचला. कामरान अकमलने अखेरच्या फळीत थोडंस धैर्य दाखवत शतक झळकावलं आणि आम्ही २४० धावा केल्या. ज्यावेळी आमच्या गोलंदाजांची वेळ आली शोएब जबरदस्त गोलंदाजी करत होता. मी स्केअर लेगला उभा होतो, शोएबचे एक-दोन बाऊन्सर खेळताना सचिनला डोळे बंद करुन घेताना मी पाहिलं आहे. त्या सामन्यात भारतीय फलंदाज बॅकफूटवर खेळत होता आणि आम्ही त्यांना पहिल्या डावात २४० धावाही करु दिल्या नाहीत. त्यावेळी आम्ही अक्षरशः पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणला होता.” आसिफ The Burgerz या पाकिस्तानी कार्यक्रमात बोलत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खराब सुरुवात झाल्यानंतरही पाकिस्तानने या कसोटीत कामरान अकमलच्या शतकाच्या जोरावर २४५ धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ २३८ धावांपर्यंत मजल मारु शकला. यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानी फलंदाजांनी सामन्यावर आपलं नियंत्रण मिळवत ७ गड्यांच्या मोबदल्यात ५९९ धावा केल्या. दुसऱ्या डावात युवराज सिंहने शतक झळकावत झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतू अब्दुल रझ्झाक आणि मोहम्मद आसिफच्या माऱ्यासमोर भारताचा डाव कोलमडला होता.