रोहित शर्माने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात बाजी मारत ५ वन-डे सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. भारतीय आक्रमणासमोर विंडीजचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्यप्रमाणे कोसळला. मात्र भारताने विंडीजचं हे आव्हान १ गडी गमावत सहज पूर्ण केलं. अखेरच्या सामन्यात तब्बल ११ विक्रमांची नोंद करण्यात आली.

० – रोहित आणि विराट जोडीने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४ हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. ६६ भागीदाऱ्यांमध्ये या जोडीने ही कामगिरी केली आहे. याआधी हा विक्रम राहुल द्रविड-सौरव गांगुली या जोडीच्या नावावर होता.

१ – वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० षटकार लगावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा. रोहितने १८७ डावांमध्ये ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावावर जमा होता.

१ – किमान २५ सामन्यांचं कर्णधारपद भूषवण्याच्या निकषावर विंडीजचे माजी कर्णधार क्वाइड लॉईड यांच्या विजयाची टक्केवारी विराट कोहलीपेक्षा अधिक आहे. क्वाइड लॉईट – ७६-१९ टक्के, विराट कोहली – ७३.६८ टक्के

२ – विराट कोहलीने या मालिकेत ४५३ धावा काढल्या. आतापर्यंत ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत केवळ २ फलंदाजांनी विराट कोहलीपेक्षा जास्त धावा काढल्या आहेत.

  • १) फखार झमान – ५१५ धावा (झिम्बाब्वे विरुद्ध)
  • २) हॅमिल्टन मासाकात्झा – ४६७ धावा (केनिया विरुद्ध)

३ – चेंडूंच्या निकषावर वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने ही कामगिरी करण्यासाठी ८३७८ चेंडू घेतले. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने ही कामगिरी ४२०३ चेंडूत तर न्यूझीलंडच्या ब्रेंडम मॅक्युलमने ही कामगिरी ६३०८ चेंडूत केली होती.

६ – वन-डे क्रिकेटमध्ये ४ हजार धावांचा टप्पा ओलांडणारी विराट-रोहित ही भारताची सहावी जोडी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही जोडी १२ वी ठरली आहे.

७ – वन-डे क्रिकेटमध्ये २०० षटकार लगावणारा रोहित शर्मा सातवा फलंदाज ठरला आहे. भारताकडून महेंद्रसिंह धोनीने २०० च्या वर षटकार लगावले आहेत.

८ – विंडीजविरुद्धचा भारताचा हा सलग आठवा मालिका विजय ठरला आहे. या कामगिरीसह भारताने श्रीलंकेविरुद्ध आपल्या कामगिरीशी बरोबरी केली आहे.

१५ – विराट कोहलीच्या खात्यात १५ मालिकावीराचे किताब जमा झाले आहेत. यासह विराटने जॅक कॅलिजच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. आतापर्यंत सचिन तेंडुलकरने २० वेळा मालिकावीराचा किताब पटकावला आहे.

१०४ – विंडीजची भारताविरुद्धची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. याआधी १२१ ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या होती.

२११ –
भारताने २११ चेंडू बाकी राखून आजचा सामना जिंकला. चेंडू राखून सामना जिंकण्याच्या निकषावर भारताचा हा सर्वात दुसरा मोठा विजय ठरला आहे. याआधी भारताने केनियावर २३१ चेंडू राखून मात केली होती.