भारतीय खेळाडू परदेशातील टी २० लीग स्पर्धांमध्ये खेळू शकत नाहीत असा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) नियम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही IPL मध्ये सहभागी व्हायचं असेल, तर परदेशी टी २० लीगमध्ये सहभागी होण्याची कोणत्याही भारतीय खेळाडूला परवानगी नाही. जे भारतीय खेळाडू भारताच्या संघात आपलं स्थान टिकवण्याच्या शर्यतीमध्ये नाहीत, त्यांना विदेशी टी २० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी फलंदाज सुरेश रैना आणि माजी गोलंदाज इरफान पठाणने केली होती. मात्र BCCI ने त्यांची मागणी फेटाळली. BCCI च्या या नियमांमुळे आणि काही इतर कारणांमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने IPL च्या पहिल्या हंगामात आपले खेळाडू पाठवण्यास नकार दिला होता.

२००८ साली इंग्लंडचा फलंदाज ल्यूक राईट याला IPL मध्ये खेळायचे होते. पण क्रिकेट मंडळाने परवानगी नाकारल्याने त्याचा आणि अनेक खेळाडूंचा हिरमोड झाला. ल्यूक राईटला सचिननेदेखील मुंबईकडून खेळण्याची ऑफर दिली होती. ती संधी गमावल्याचा अजूनही त्याला पश्चात्ताप होतो. “इंग्लंडच्या संघाकडून कारकिर्द घडवण्याआधी विविध टी २० लीग स्पर्धांमध्ये खेळले पाहिजे अशा मताचा मी होतो. अशा स्पर्धांमधून खेळाचा थोडा अनुभव येतो. सध्याच्या खेळाडूंना याचाच फायदा मिळतो. मी जेव्हा पहिलं IPL खेळू शकलो नाही. त्यानंतर सचिनने मला फोन करून ऑफरदेखील दिली की तू मुंबईकडून IPL खेळ… पण त्यावेळी मला वाटलं होतं की सचिन मस्करी करतोय. त्यामुळे मी काहीच बोललो नाही”, अशी आठवण ल्यूक राईटने सांगितली.

ल्यूक राईट सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना

दरम्यान, ल्यूकला IPL मध्ये फारशी कमाल दाखवता आली नाही. २०१२ ला त्याने पुणे वॉरियर्स संघाकडून पदार्पण केले. दिल्ली विरूद्धच्या एका सामन्यात त्याने सामनवीराचा किताब पटकावला. पण २ वर्षांच्या कालावधीत त्याला केवळ ७ सामन्यात संधी मिळाली. त्या ७ सामन्यांत त्याने एकूण १०६ धावा केल्या आणि केवळ २ गडी बाद केले.