भारत-दक्षिण आफ्रिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज

बांगलादेशमध्ये झालेला मानहानीकारक पराभव, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत आलेले अपयश, हे सारे पाहता भारताच्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. आता तर भारतीय संघाला डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केलसारख्या आग ओकणाऱ्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे रविवारपासून सुरू होणारी एकदिवसीय मालिका धोनी आणि भारतीय संघासाठी अग्निपरीक्षाच असेल. ट्वेन्टी-२० मालिकेतील अपयश दूर सारत एकदिवसीय क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल, दुसरीकडे आफ्रिकेच्या संघाने दौऱ्याची झोकात सुरुवात केली असून, त्यांनी कामगिरीमध्ये सातत्य राखले तर त्यांच्यासाठी ही मालिका फारशी अवघड जाणार नाही.

ट्वेन्टी-२० मालिकेत रोहित शर्माच्या शतकाचा अपवादवगळता एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शिखर धवन चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरला आहे. विराट कोहलीलाही आपली छाप पाडता आलेली नाही. बऱ्याच कालावधीनंतर संघात परतलेल्या सुरेश रैनाला अजूनही लय सापडलेली नाही. धोनीच्या बॅटला गंज लागलाय का, असे प्रश्न चाहत्यांना पडू लागले असून गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्याकडून नेत्रदीपक फलंदाजी पाहायला मिळालेली नाही. अजिंक्य रहाणेला एकदिवसीय मालिकेत संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गोलंदाजीमध्ये सध्याच्या घडीला आर. अश्विनचा अपवादवगळता एकही गोलंदाज चांगल्या फॉर्मात दिसत नाही. भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांच्या गोलंदाजीचा आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यामुळे ही मालिका त्यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. पण उमेश यादव, अमित मिश्रा आणि पंजाबच्या गुरकीरत सिंग यांच्यासाठी ही नामी संधी असेल.

आफ्रिकेने ट्वेन्टी-२० मालिका जिंकत झोकात सुरुवात केली आहे. एबी डी’व्हिलियर्स आणि जेपी डय़ुमिनी चांगल्या फॉर्मात आहेत. पण अन्य फलंदाजांना मात्र अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. गोलंदाजीमध्ये स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल यांचे संघात आगमन झाले असून ती त्यांच्यासाठी जमेची बाजू असेल.

सध्याच्या घडीला आफ्रिकेचे मनोल कमालीचे उंचावलेले आहे. ते जर गाफील राहिले नाहीत तर त्यांच्यासाठी ही मालिकाही अवघड नसेल. दुसरीकडे पराभव भारताच्या जिव्हारी लागला असून यामधून त्यांनी ईर्षेने पेटून उठून मैदानात सकारात्मक क्रिकेट खेळणे गरजेचे आहे, त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाल्यास ते आफ्रिकेला नक्कीच धक्का देऊ शकतील.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, मोहित शर्मा, उमेश यादव, गुरकीरत सिंग, अमित मिश्रा, रवीचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी.

दक्षिण आफ्रिका : एबी डी’व्हिलियर्स (कर्णधार), क्विंटन डि कॉक, हशिम अमला, फॅफ डू प्लेसिस, जेपी डय़ुमिनी, डेव्हिड मिलर, फरहान बेहराडीन, ख्रिस मॉरिस, इम्रान ताहीर, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, कागिसो रबाडा, कायले अबॉट, खाया झोंडो, आरोन फॅनगिसो

सामन्याची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी वाहिन्यांवर.