टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये १०० मीटर हर्डल रेसमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत जमैकाच्या हांसले पार्शमेंटने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हांसलेच्या या कामगिरीवर चाहते भलतेच खूष आहेत. मात्र असं असतानाच आता हांसलेने हे पदक जिंकण्यामागे एका अनोळखी तरुणीने केलेली मदत कारणीभूत ठरल्याचं सांगितलं आहे. ही अनोळखी तरुणी म्हणजे ऑलिम्पिक आयोजन समितीमधील एक स्वयंसेविका होती. झालं असं की अंतिम सामन्यासाठी आपल्या राहण्याच्या ठिकाणावरुन निघालेला हांसले दुसऱ्याच ठिकाणी पोहचला. चुकीची बस पकडल्याने शर्यत आयोजित करण्यात आलेल्या मैदानाऐवजी हांसले दुसऱ्याच व्हेन्यूवर पोहचला. त्यावेळी तो अगदी संभ्रमावस्थेत होता. तेव्हा त्याला या तरुणीने मदत केली.

हांसलेने नक्की काय घडलं यासंदर्भातील किस्सा सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत तो सांगतो त्याप्रमाणे अंतिम सामन्याच्या दिवशी चुकीची बस पकडल्याने मी चुकीच्या ठिकाणी पोहचलो. तिथे पोहचल्यानंतर आता आपल्याला मैदानात वेळेत पोहचून शर्यतीत सहभागी होता येणार नाही असं हांसलेला वाटू लागलं. मात्र त्यावेळी त्याने शर्यत असणारं मैदान कुठे आहे अशी चौकशी एका महिला स्वयंसेविकेकडे केली. तिने मैदान येथून दूर असल्याचं सांगितलं. इतकच नाही तर हांसलेला या ठिकाणी पोहचात यावं म्हणून तिने पत्ता देण्याबरोबरच त्याला टॅक्सीचे पैसेही दिले. या तरुणीने केलेल्या मदतीमुळे हांसले शर्यतीच्या आधी मैदानात पोहचला. त्याला तिथे थोडा सराव करता आला आणि शर्यतीमध्ये त्याने इतिहास घडवला.

उपांत्यफेरीच्या सामन्याच्या वेळेस मी चुकीच्या बसमध्ये चढलो. माझ्या कानामध्ये हेडफोन्स असल्याने आजूबाजूचे लोक काय बोलत आहेत हे मला समजतं नव्हतं. मात्र नंतर मला कळालं की बस दुसऱ्याच मार्गाने चाललीय. ही बस थांबली तेव्हा मला मी मैदानाच्या परिसरामध्ये उतरलो नसून रस्ता चुकल्याचं जाणवं. मी रोईंगची स्पर्धा असणाऱ्या ठिकाणी पोहचलो होतो, असं हांसले सांगतो.

गोंधळलेल्या अवस्थेत हांसलेने एका स्वयंसेविकेची मदत मागितली. तिने पत्ता देण्याबरोबरच टॅक्सीचे पैसेही हांसलेला दिले. बसपेक्षा टॅक्सीने वेळेत पोहचता येईल या हेतूने तिने हांसलेला मदत केली. या मदतीमुळेच वेळेत मैदानात पोहचून शर्यत जिंकलेल्या हांसलेने नंतर या महिला स्वयंसेविकेला शोधून काढलं. त्याने तिला ऑलिम्पिक गोल्ड मेडल दाखवण्यासाठी आणलं होतं. त्याने तिची भेट घेत तिचे आभार मानले आणि ते मेडलही दाखवलं. त्या तरुणीला मेडल पाहून आश्चर्य वाटलं आणि तिने मेडलचा फोटो तसेच हांसलेसोबत फोटो क्लिक करण्याची इच्छा व्यक्त केली. हांसलेनेही तिची ही इच्छा पूर्ण केली. त्यानंतर त्याने या मुलीला तिचे पैसेही परत केले. यासंदर्भातील व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.

५ ऑगस्ट रोजी झालेल्या ११० मीटर हर्डल रेसमध्ये हांसलेने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने जागतिक विजेता ग्रांट होलोवेला पराभूत करत हा पराक्रम केला. हांसलेचा हा विजय अगदीच अनपेक्षित होता.