टी२० क्रिकेट हा प्रामुख्याने फलंदाजांचा खेळ मानला जातो. या प्रकारात गोलंदाजांची जोरदार धुलाई केली जाते. आजच झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर अॅरॉन फिंच याने हरारे येथे सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत यजमान झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई करत तब्बल १७२ धावा ठोकल्या. या विक्रमासह त्याने स्वतःचा १५६ धावांचा विक्रम मोडीत काढला. फिंचच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकात २२९ धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे-पाकिस्तान या संघांमध्ये सध्या झिम्बाब्वेमध्ये तिरंगी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आज झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि सलामीवीर फिंचने त्यांच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. फिंचने केवळ ७६ चेंडूत १७२ धावा केल्या. या तुफानी खेळामध्ये त्याने १६ चौकार आणि १० षटकार ठोकले. फिंचने २२६ च्या स्ट्राईक रेटने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानिमित्त पाहू या टी२० क्रिकेटमधील पाच सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या…

१. अॅरॉन फिंच – आज झालेल्या सामन्यात फिंचने १७२ धावा केल्या. झिम्बाब्वेविरूद्ध त्याने हा पराक्रम केला.

२. अॅरॉन फिंच – या यादीत दुसऱ्या स्थानीदेखील फिंच आहे. फिंचने इंग्लंडविरुद्ध २०१३ साली हा विक्रम केला होता. त्यावेळी फिंचने १५६ धावा केल्या होत्या.

३. ग्लेन मॅक्सवेल या यादीत तिसरे स्थानदेखील ऑस्ट्रेलियन खेळाडूने पटकविले आहे. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने श्रीलंकेविरुद्ध नाबाद १४५ धावा केल्या होत्या. २०१६मध्ये त्याने हा पराक्रम गाजवला होता.

४. एव्हीन लुईस – विंडीजच्या या सलामीवीराने या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. त्याने भारताविरुद्ध २०१७साली नाबाद १२५ धावा ठोकल्या होत्या.

५. शेन वॉटसन – या यादीत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीराने स्थान पटकावले आहे. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येच्या यादीत वॉटसनचा पाचवा क्रमांक आहे. त्याने नाबाद १२४ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे २०१६ साली त्यानेदेखील भारताविरुद्धच ही कामगिरी केली होती.