चॅम्पियन्स करंडकातील भारताची विजयी घोडदौड वेस्ट इंडिजने कॅरेबियन बेटांवर रोखण्याची किमया साधली. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा फक्त एक विकेट राखून पराभव केला. मंगळवारी भारतीय संघ तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील दुसऱ्या लढतीत श्रीलंकेशी झुंजणार आहे.
भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार कसोटी समान्यांची मालिका जिंकल्यानंतर लंडनमध्ये चॅम्पियन्स करंडक जिंकताना पाच सामन्यांत विजय मिळवला होता. ही नऊ सामन्यांची मालिका वेस्ट इंडिजने खंडित केली. कॅरेबियन खेळपट्टय़ांवरील पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजी झगडताना आढळली. परंतु भारतीय गोलंदाजांनी मात्र आपली भूमिका चोख बजावली. त्यामुळे वेस्ट इंडिजला मोठा विजय मिळविण्यात अपयश आले.
पायाला लचक भरल्याने भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजीप्रसंगी क्षेत्ररक्षणाला उतरू शकला नव्हता. या पाश्र्वभूमीवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात धोनी खेळू शकणार का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
ज्या खेळपट्टीवर अन्य फलंदाजांना मोठे फटके खेळण्यात अपयश येत होते, तिथे रोहित शर्माने संयमाने खेळून अर्धशतक साजरे केले. चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत सलामीवीर म्हणून चांगला जम बसवल्यानंतर रोहितने विंडीजमध्येही आपली कामगिरी कायम राखली आहे. परंतु शिखर धवन, विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी नव्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण गेले. सुरेश रैनाने मात्र ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारून भारताला दोनशे धावसंख्या गाठून दिली.
भारताच्या गोलंदाजांनी मात्र आपले सातत्य कायम राखले. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि इशांत शर्मा या भारताच्या वेगवान त्रिकुटाने टिच्चून गोलंदाजी केली.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट, टेन स्पोर्ट्स.
तिरंगी स्पध्रेतून धोनीची माघार
किंग्स्टन : भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या पोटरीला दुखापत झाल्यामुळे त्याला तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे विराट कोहलीकडे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. याचप्रमाणे धोनीऐवजी बदली खेळाडू म्हणून फलंदाज अंबाती रायुडू वेस्ट इंडिजकडे प्रस्थान करणार आहे.