भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ट्विटरवर आनंद व्यक्त केला. पण काही ट्विटरकरांनी यावर नाराजी व्यक्त करत दोघांवर निशाणा साधला. मग दोन्ही क्रिकेटपटूंनी आपल्या ‘मास्टर स्ट्रोक’ अंदाजात प्रत्युत्तर दिले.
कैफने कुलभूषण जाधवप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत भारताचे अभिनंदन करत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आभार व्यक्त केले. तर सेहवागने ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट केलं. कैफच्या ट्विटवर एका युझरने कैफला त्याच्या नावातून मोहम्मद हे नाव काढून टाकण्याचा निरर्थक सल्ला दिला. कुलभूषणप्रकरणी आनंद व्यक्त करणाऱ्या कैफने आपल्या नावातून मोहम्मद हे नाव काढून टाकावे, असे ट्विट एकाने केले. त्यावर कैफनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले.
”अरे व्वा..भारताच्या विजयाला माझा पाठिंबा असेल तर मला माझं नाव बदलावं लागेल!! मला माझ्या नावाचा गर्व आहे आणि यापुढेही राहिल. तुलाही याची गरज आहे. ”, अशी प्रतिक्रिया कैफने दिली.

सेहवागच्या ट्विटवर एका युझरने ”तुम्ही मेंदू नसल्यासारखं का वागत आहात? अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाहीय #Pak” अशा हॅशटॅगसह पाकची बाजू घेतली. त्यावर सेहवागने चांगलच सुनावलं. ”भारताला वर्ल्डकपमध्ये पराभूत करावं हेच तुझं स्वप्न असेल ना? एकवेळा कुत्रा पाळ, मांजर पाळ, पण गैरसमज पाळू नकोस.”, अशी खोचक प्रतिक्रिया देत सेहवागने त्या ट्विटरकराचं तोंडच बंद केलं.