सामना निश्चितीप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू २० वर्षे बंदीची शिक्षा उपभोगत आहे. या प्रकरणी वेगवान गोलंदाज लोनवाबो त्सोत्सोबेची चौकशी सुरू आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या सूचनेनुसार त्सोत्सोबेने आपली बँक खाती आणि मोबाइल संभाषणाच्या नोंदी चौकशी समितीला सुपूर्द केल्या आहेत, असे ‘विस्डेन इंडिया’ वेबसाइटने म्हटले आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज गुलाम बोडीवर बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्थानिक ट्वेन्टी-२० लीगमध्ये सामना निश्चिती किंवा सामन्यातील काही भागांची निश्चिती करण्यासाठी काही खेळाडूंची नेमणूक केल्याचा कट त्याने रचला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बोडी आठ खेळाडूंच्या संपर्कात होता. बोडीचे स्थानिक क्रिकेटमधील माजी सहकारी दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक थामी त्सोलेकिल आणि त्सोत्सोबे यांची नावे प्रसारमाध्यमांनी दिली आहेत.
‘‘दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने मागितलेली प्रत्येक गोष्ट मी त्यांना दिली आहे. माझे मोबाइल बिल, बँक खाती यांचा यात समावेश आहे,’’ असे त्सोत्सोबेने सांगितले. सामना निश्चितीसाठी बोडीकडून पैसे घेतल्याचा मात्र त्सोत्सोबेने इन्कार केला. त्सोलेकिलचीसुद्धा चौकशी सुरू असून, त्यानेही आपण सहभागी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज त्सोत्सोबेने पाच कसोटी, ६१ एकदिवसीय आणि २३ ट्वेन्टी-२० सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४मध्ये बांगलादेशला झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात तो अखेरचा राष्ट्रीय संघात दिसला होता. त्सोलेकिल २००४मध्ये आपल्या कारकीर्दीतील अखेरचे तीन कसोटी सामने खेळला होता.
भारतीय वंशाच्या बोडीला सामना निश्चिती प्रकरणात दोषी आढळल्यामुळे शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रत्येक सामन्यात अपेक्षित कामगिरी करण्यासाठी खेळाडूपुढे ५० हजार अमेरिकन डॉलर्सपर्यंत रकमेचा प्रस्ताव ठेवला जायचा, अशी माहिती बोडीच्या चौकशीतून स्पष्ट झाली आहे.