खरं वय लपवून क्रिकेट स्पर्धांमध्ये लहान वयोगटात खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या प्रकरणाची BCCI ने गंभीर दखल घेतली आहे. वय चोरी करण्यात दोषी आढळल्यास दोषी क्रिकेटपटूंना दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. BCCI ने मंगळवारी याबाबत माहिती दिली.

विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये वयचोरी करणारे खेळाडू कोण? हे शोधण्यासाठी BCCI कडे कोणतीही खास अशी प्रक्रिया नाही. पण नाव नोंदणी करताना खोटी जन्मतारीख सादर करणाऱ्या खेळाडूंवर यापुढे कठोर कारवाई केली जाणार आहे, असे BCCI ने निवेदनात नमूद केले आहे.

यापूर्वी असे केल्यास दोषी क्रिकेटपटूंवर एका वर्षासाठी बंदी घालण्यात येत होती. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात दिल्लीच्या जसकिरत सिंगला १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत वय लपवल्याच्या प्रकरणात पकडले होते. या प्रकारच्या वाढत्या घटनांमुळेच २०१६मध्ये माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या सांगण्यावरून बीसीसीआयने १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही एका खेळाडूला एकदाच सहभागी होण्याची परवानगी दिली होती.