दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार ४४ धावांनी मात केली आहे. फलंदाजीत मुंबईकर यशस्वी जैस्वाल तर गोलंदाजीत अथर्व अंकोलेकर यांनी आपली चमक दाखवली. भारताने विजयासाठी दिलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना, न्यूझीलंडचा संघ १४७ धावांपर्यंत मजल मारु लागला.

नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र काही वेळानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावली. बराच काळ पाऊस पडत असल्यामुळे सामन्यातला मोठा वेळ वाया गेला. अखेरीस पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंच आणि सामनाधीकारी यांनी खेळपट्टीची पाहणी करत सामना २३ षटकांचा केला. भारताकडून यशस्वी जैस्वालने नाबाद ५७ तर दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५२ धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या संघाची सुरुवातही आश्वासक झाली होती. सलामीवीर फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. रवी बिश्नोईने ऑली व्हाईटला माघारी धाडत न्यूझीलंडला धक्का दिला. यानंतर ऱ्ह्यास मारीयूही अंकोलेकरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर न्यूझीलंडचा संघ सावरुच शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत राहिल्यामुळे भारतीय गोलंदाजांचं काम सोपं झालं. भारताकडून रवी बिश्नोईने ४, अथर्व अंकोलेकरने ३, सुशांत मिश्रा आणि कार्तिक त्यागी यांनी १-१ बळी घेतला.