जागतिक टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान असणाऱ्या अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडरर याने रविवारी ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त, नोव्हाक जोकोव्हिच व मरिन चिलिच यांनीसुद्धा पुढील फेरीतील प्रवेश निश्चित केला. मात्र जर्मनीचे दोन टेनिसपटू अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि अँजेलिक कर्बर यांचे अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीतील आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले.

कारकीर्दीत आतापर्यंत पाच वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या द्वितीय मानांकित फेडररने किर्गिओसला ६-४,६-१, ७-५ असे नमवले. फोरहँड तसेच बॅकहँडच्या फटक्यांचा सुरेख वापर करत फेडररने किर्गिओसला चांगलेच थकवले. उपउपांत्यपूर्व फेरीत ३७ वर्षीय फेडररला जॉन मिलमनचे आव्हान असणार आहे. सहाव्या मानांकित जोकोव्हिचने २६व्या मानांकित रिचर्ड गॅसक्वेटवर ६-२, ६-३, ६-३ अशी मात केली. तर सातव्या मानांकित चिलिचने अ‍ॅलेक्स डी मिनौरवर संघर्षपूर्ण सामन्यात ४-६, ३-६, ६-३, ६-४, ७-५ अशी पाच सेटमध्ये विजय मिळवला. चौथ्या मानांकित झ्वेरेव्हला जर्मनीच्याच फिलिप कोलस्क्रिबरकडून ६-७, ६-४, ६-१, ६-३ असा पराभव स्वीकारावा लागला.

महिला एकेरीत यंदाच्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती चौथी मानांकित कर्बरला स्लोव्हिाकियाच्या २९व्या मानांकित डॉमिनिका सिबुलकोव्हाने ३-६, ६-३, ६-३ असे पराभूत केले. यंदा महिला एकेरीतील पहिल्या दहा मानांकित खेळाडूंपैकी फक्त तिघींनाच उपउपांत्यपूर्व फेरी गाठता आली आहे. २२व्या मानांकित मारिया शारापोव्हाने १०व्या मानांकित जेलेना ओस्तापेन्कोवर ६-३, ६-३ अशी सहज मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

दिविज शरण पराभूत

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारताच्या दिविज शरणचे पुरुष दुहेरीतील आव्हान रविवारी संपुष्टात आले. शरण आणि ऑस्ट्रेलियाच्या अर्टेम सितक यांच्या जोडीला सातव्या मानांकित मार्सेलो मेलो व लुकास कुबोट यांच्याकडून ३-६, ६-३, ३-६ अशा पराभवाला सामोरे जावे लागले.