विदर्भ संघाने हिमाचल प्रदेशचा ३-० असा पराभव करीत वरिष्ठांच्या आंतरराज्य व राष्ट्रीय कॅरम स्पर्धेतील पुरुषांच्या विभागात विजयी सलामी दिली. कर्नाटक व उत्तर प्रदेश यांनीही विजयी प्रारंभ केला.

विदर्भ संघाकडून इर्शाद अहमदने हिमाचल संघाच्या संजीवकुमारला २५-०, २५-० असे निष्प्रभ केले. नीलेश जांभूळकरने बुद्धसेन नेगीचा २५-१, २२-० असा धुव्वा उडविला व संघाला २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या लढतीत नंद पाटीलने रमेश ठाकूर याच्यावर २५-०, २५-७ अशी मात केली आणि संघाला ३-० असे निर्विवाद यश मिळवून दिले. कर्नाटक संघाने झारखंड संघाचा ३-० असा पराभव केला. त्या वेळी त्यांच्या बी.चंद्रशेखरने शुभम शेखर याच्यावर २५-३, १८-१७ अशी मात केली.  पाठोपाठ बी. राजेशने झारखंडच्या राजेश शर्मा याला २५-१०, २५-२२ असे हरविले. दुहेरीत एम. विनोद व आर. शिवकुमार यांनी राजेश शर्मा व तरुणकुमार यांना २५-४, २५-१ असे पराभूत करीत कर्नाटकला ३-० असा विजय मिळवून दिला.

उत्तर प्रदेश संघाने गोवा संघावर ३-० असा सफाईदार विजय नोंदविला. उमर तन्वीर व रिहान खान यांनी एकेरीचा सामना जिंकले. दुहेरीत रिझवान व महंमद अरीफ यांनी उत्तर प्रदेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.