क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे असे कायम बोलले जाते. क्रिकेटमध्ये केव्हा काय घडेल याचा नेम नसतो. कधी पराभूत होणारा संघ अचानक जिंकतो, तर कधी प्रतिस्पर्धी संघ जिंकणाऱ्या संघाच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतो. कधी दोन प्रतिस्पर्धी खेळाडू मैदानावर भिडतात, तर कधी एकाच संघातील खेळाडू राडा करतात. पण नुकत्याच झालेल्या एका सामन्यात एक आतिशय विचित्र किस्सा घडला.

टी २० ब्लास्ट या स्पर्धेत डरहॅम आणि यॉर्कशायर या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. रिव्हरसाईड ग्राउंड मैदानावरील या सामन्यात यॉर्कशायरचा यष्टिरक्षक जोनाथन टॅटरसाल याने आपल्याच संघातील सहकारी गोलंदाज केशव महाराज याला चेंडू मारल्याचा भन्नाट विनोदी किस्सा घडला. व्हायटॅलिटी टी २० ब्लास्ट या स्पर्धेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या केशव महाराज या फिरकीपटूने अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. फलंदाजाला तो चेंडू स्वीप करायचा होता, पण चेंडू फलंदाजाच्या पायाला लागला आणि फलंदाजाचा प्रयत्न फसला. तरीदेखील फलंदाज चोरटी एकेरी धाव घेण्याच्या उद्देशाने धावले. नॉन स्ट्राईकवर फलंदाज पोहोचण्याच्या आधी चेंडू स्टंपवर मारावा असा यष्टिरक्षक जोनाथन टॅटरसालचा विचार होता. त्याप्रमाणे त्याने धावत जाऊन चेंडू अडवला आणि चेंडू स्टंपवर फेकला. या धावपळीत चुकून यष्टिरक्षकाने फेकलेला चेंडू गोलंदाजाच्या अंगावर जाऊन आदळला. त्याला चेंडू इतका जोरात लागला की गोलंदाज अक्षरश: कळवळला.

दरम्यान, या प्रकारानंतरही केशव महाराजने आपला ४ षटकांचा कोटा पूर्ण केला. यॉर्कशायर संघाने डरहॅम संघावर अटीतटीच्या सामन्यात १४ धावांनी विजय मिळवला.