कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्लीवर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर 4 गडी राखून मात करत विजय संपादन केला. दिल्लीने विजयासाठी दिलेलं 178 धावांचं आव्हान, मुंबईने आदित्य तरे आणि सिद्धेश लाडच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पूर्ण केलं. आदित्य तरेने सामन्यात 71 धावांची अर्धशतकी खेळी केली. सिद्धेश लाडने 48 धावांची खेळी करुन त्याला चांगली साथ दिली. 2006-07 साली मुंबईने या स्पर्धेचं शेवटचं विजेतेपद मिळवलं होतं. यानंतर तब्बल 12 वर्षांनी मुंबईला या मानाच्या स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. तुषार देशपांडे आणि धवल कुलकर्णी यांच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचे 3 फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर नितीश राणाने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवम दुबेने सिद्धेल लाडकरवी झेलबाद करत दिल्लीच्या संघाला आणखी एक धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने दिल्लीचे फलंदाज माघारी परतत राहिले. दिल्लीकडून मधल्या फळीत हिम्मत सिंहने तळातल्या फलंदाजांना साथीला घेत दिल्लीला 150 धावसंख्या गाठून दिली. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शिवम दुबे यांनी प्रत्येकी 3-3 फलंदाजांना बाद केलं. तर दुषार देशपांडेने 2 आणि शम्स मुलानीने 1 विकेट घेतली.

178 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवातही अडखळती झाली. नवदीप सैनीने पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादवला माघारी धाडत मुंबईला धक्का दिला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर कुलवंत खेजरोलियाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र यानंतर श्रेयस अय्यर आणि आदित्य तरे यांनी संघाचा डाव सावरत पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत संघाला विजयाच्या नजिक नेलं. या खेळीदरम्यान आदित्य तरेने अर्धशतकी खेळीही केली. 71 धावसंख्येवर मनन शर्माच्या गोलंदाजीवर तरे पायचीत होऊन माघारी परतला. सिद्धेश लाडने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र 48 धावसंख्येवर मोठा फटका खेळत असताना लाड झेलबाद होऊन माघारी परतला. यानंतर शिवम दुबे आणि धवल कुलकर्णी यांनी मुंबईच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

More Stories onएमसीएMCA
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay hajare trophy 2018 mumbai beat delhi in final by 5 wickets claims title
First published on: 20-10-2018 at 16:06 IST