Sai Sudarshan breaks Sachin Tendulkar’s record : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शुक्रवारी सामना रंगला. या सामन्यात नाणेफेक जिंकून सीएसकेने गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जीटीचे सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शतकं झळकावत चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. साई सुदर्शनने ५१ चेंडूत १०३ धावांची खेळी खेळली. दरम्यान, त्याने एक मोठा पराक्रम केला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू ठरला. या बाबतीत त्याने ऋतुराज गायकवाडसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साईने ऋतुराजसह सचिनला टाकले मागे –

साई सुदर्शनची आयपीएलमधील ही २५ वी इनिंग होती. या इनिंगमध्ये त्याने आयपीएलमधील १००० धावा पूर्ण केल्या. यासह साई सुदर्शन सर्वात कमी डावात १००० धावा करणारा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाड यांच्या नावावर होता, ज्यांनी ३१व्या डावात ही कामगिरी केली होती. एकूण विक्रमाबद्दल बोलायचे, तर शॉन मार्शच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने २१ व्या डावात एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. लेंडल सिमन्स २३ आणि मॅथ्यू हेडनने २५ व्या डावात एक हजार धावांचा आकडा गाठला आहे.

शुबमन-साईची पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी –

साई सुदर्शनने गुजरात टायटन्ससाठी शानदार फलंदाजी करत ५१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारले. हे त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील पहिले शतक आहे. आयपीएल २०२३ च्या फायनलमध्येही त्याने चेन्नईविरुद्ध दमदार फलंदाजी केली होती. पण दुर्दैवाने तो ९६ धावांवर बाद झाला. अंतिम फेरीत सुदर्शनने २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने या बरोबर शुबमन गिलसह पहिल्या विकेटसाठी विक्रमी २१० धावांची भागीदारी केली. ही आयपीएलमधील पहिल्या विकेटसाठी धावांची संयुक्त सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी २०२२ मध्ये केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी २१०* धावा जोडल्या होत्या.

हेही वाचा – GT vs CSK : आयपीएलमध्ये ‘शतक शंभरी’; शुबमन गिल, साई सुदर्शनने झळकावली वेगवान शतकं

सर्वात जलद १००० आयपीएल धावा करणारे भारतीय (डावाच्या बाबतीत)

२५* – साई सुदर्शन
३१ – सचिन तेंडुलकर
३१ – ऋतुराज गायकवाड
३३ – तिलक वर्मा
३४ – सुरेश रैना

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai sudarshan breaks sachin tendulkars record fastest 1000 runs in ipl history during gt vs csk match vbm
First published on: 10-05-2024 at 22:27 IST