विजय हजारे क्रिकेट स्पर्धा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये बलाढय़ मानल्या जाणाऱ्या मुंबई संघाने सोमवारी हिमाचल प्रदेशचा २०० धावांनी दणदणीत पराभव करत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. तसेच ‘ड’ गटात अग्रस्थान मिळवून दिमाखात बाद फेरी गाठली.

सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३२१ धावा उभारल्या. यशस्वी जैस्वाल (२), पृथ्वी शॉ (२) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (२) हे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यामुळे मुंबईची अवस्था ३ बाद ८ धावा अशी बिकट झाली होती. त्यानंतर सर्फराझ खानही (११) मैदानावर फार काळ तग धरू शकला नाही.

सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे या माजी कर्णधारांनी पाचव्या गडय़ासाठी ९९ धावांची भागीदारी रचत मुंबईला संकटातून बाहेर काढले. सूर्यकुमारने हिमाचल प्रदेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत ७५ चेंडूंत १५ चौकारांसह ९१ धावांची खेळी केली. सूर्यकुमार ३१व्या षटकांत बाद झाल्यानंतर तरे आणि शार्दूल ठाकूर यांनी सहाव्या गडय़ासाठी ११२ दावा जोडल्या. शार्दूलने तडाखेबंद फलंदाजी करताना ५७ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांनिशी ९२ धावा फटकावल्या. तरेने ८३ धावा करत मुंबईला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. हिमाचलकडून रिषी धवनने चार तर जसवालने तीन बळी मिळवले.

मुंबईचे हे आव्हान पेलताना हिमाचल प्रदेशच्या फलंदाजांनी धवल कुलकर्णी, प्रशांत सोलंकी आणि शाम्स मुलानी यांच्या प्रभावी माऱ्यासमोर नांगी टाकली. तळाच्या मयांक डगरने नाबाद ३८ धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यामुळे हिमाचल प्रदेशचा डाव १२१ धावांवर संपुष्टात आणत मुंबईने २०० धावांनी विजय नोंदवला. मुंबईकडून सोलंकीने चार बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : ५० षटकांत ९ बाद ३२१ (शार्दूल ठाकूर ९२, सूर्यकुमार यादव ९१, आदित्य तरे ८३; रिषी धवन ४/८४, पंकज जसवाल ३/६५) विजयी वि. हिमाचल प्रदेश : २४.१ षटकांत सर्व बाद १२१ (मयांक डगर नाबाद ३८, प्रवीण ठाकूर २२; प्रशांत सोलंकी ४/३१, शाम्स मुलानी ३/४२)